वनखात्याने घेतल्या नोंदी, नकाशेही तयार
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच या जिल्ह्य़ातील १८९ ठिकाणी व्याघ्रदर्शन होत असून, या ठिकाणांची व्याघ्रस्थळ, अशी नोंद घेण्यात आली आहे. नियमित व्याघ्रदर्शन होणाऱ्या या व्याघ्रस्थळांची सविस्तर माहिती व नकाशा वनखात्याने तयार केला. यात जुनोना, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभीड, मूल व गोंडपिंपरी तालुक्यातील जंगलांचा समावेश आहे.
पट्टेदार वाघाच्या दर्शनामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जागतिक पर्यटनाचे केंद्र होत आहे. देशी-विदेशी पर्यटकांचा ओढा या प्रकल्पाकडे वाढत असून गेल्या सहा महिन्यात एक लाखावर पर्यटकांनी भेट दिल्याने प्रकल्पाला एक कोटीवर आर्थिक उत्पन्न झाले आहे. या जिल्ह्य़ात वाघांची संख्या शंभरावर असून त्यातील ४३ पट्टेदार वाघ एकटय़ा ताडोबा प्रकल्पात असून २० बछडे सुध्दा आहेत. हमखास वाघ दिसणारा एकमेव प्रकल्प, अशी ताडोबाची ख्याती झाली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी ताडोबाव्यतिरिक्त या जिल्ह्य़ात १८९ ठिकाणी व्याघ्रदर्शन होत असल्याची नोंद वनाधिकाऱ्यांनी घेतली आहे. ताडोबा प्रकल्पाप्रमाणेच येथे जुनोना, सिंदेवाही, नागभीड, आसोलामेंढा, रामदेगी, बोर्डा, सात बहिणी पहाड, मूल, सावली, सोमनाथ, गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा, झरण, तसेच भद्रावती तालुक्यातील चोरगाव, आयुध निर्माणी परिसर, चोरा, घोडाझरी परिसरात पट्टेदार वाघ हमखास दिसतो. या सर्व व्याघ्रस्थळांची नोंद वनाधिकाऱ्यांनी घेतली आहे. याशिवाय, चंद्रपूर-मूल मार्गावर हमखास वाघ दिसत असल्याची नोंदही वनखात्याने घेतलेली आहे. या मार्गावरील लोहारा, बोर्डा, घंटाचौकी, चिचपल्ली, केसलाघाट, अजयपूर या गावातही नियमित वाघ दिसत असल्याची नोंद वनखात्याने घेतले आहेत. त्यासोबतच ब्रम्हपुरी तालुक्यातील निवडक ठिकाणांची नोंद घेण्यात आली असून घोडाझरी व आसोलामेंढाच्या कॅनलमध्ये वाघ हमखास दिसतो, अशीही नोंद घेतली आहे.
चिमूर तालुक्यातील रामदेगी व ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागातही वाघ दिसत असल्याची नोंद घेण्यात आली आहे. जुनोना व गिलबिली या गावात तर बहुतांश गावकऱ्यांना वाघांनी दर्शन दिले आहे. दोन वर्षांपूर्वी जुनोनाच्या जंगलात वाघिणीने जन्म दिलेली चार नवजात पिल्ले मिळाली होती. वाघिणीने सोडून दिलेल्या या पिल्लांना नागपूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी ठेवले होते. यानंतर ही पिल्ले माणसाळली. त्यामुळे या पिल्लांना जंगलात सोडण्यात आले नाही. तोच प्रकार झरण येथे मिळालेल्या वाघाच्या पिल्लांच्या बाबतीतही झाला होता. झरण येथे वनखात्याची नर्सरी असून दोन वर्षांपूर्वी या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघांना जेरबंद करून येथेच ठेवण्यात आले होते. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाबाहेर ६५ वाघ असल्याची नोंद घेण्यात आलेली आहे. हे सर्व वाघ उन्हाळ्यात जंगलातून आत-बाहेर होत असतात. पाण्याच्या शोधात पट्टेदार वाघ अनेकदा गावात येतो. त्यासोबतच आयुध निर्माणी वसाहत व ऊर्जानगर कॉलनीतही वाघ प्रवेश करतो. या सर्व बाबींची नोंदही वनखात्याने यात घेतली आहे. ताडोबा वगळता संपूर्ण जिल्हाभरात व्याघ्रदर्शन देणारे १८९ व्याघ्रस्थळे असून या सर्व स्थळांचा भविष्यात विकास करण्याची योजना वनखाते तयार करत आहेत. त्याचा नकाशा तयार करण्यात आला असून त्यातही १८९ स्थळांची नोंद घेण्यात आलेली आहे.
ताडोबाप्रमाणे १८९ ठिकाणी हमखास व्याघ्रदर्शन
वनखात्याने घेतल्या नोंदी, नकाशेही तयार ताडोबा व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच या जिल्ह्य़ातील १८९ ठिकाणी व्याघ्रदर्शन होत असून, या ठिकाणांची व्याघ्रस्थळ, अशी नोंद घेण्यात आली आहे. नियमित व्याघ्रदर्शन होणाऱ्या या व्याघ्रस्थळांची सविस्तर माहिती व नकाशा वनखात्याने तयार केला. यात जुनोना, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभीड, मूल व गोंडपिंपरी तालुक्यातील जंगलांचा समावेश आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-05-2013 at 02:13 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest department says on 189 places tiger can be seen in tadoba