ऐरोली-मुलुंड खाडीपुलाच्या पूर्व बाजूस असलेल्या वीस हेक्टर जमिनीचा वापर करून वनविभाग या ठिकाणी मरिन इंटरप्रिटेशन सेंटर उभारणार असून या महिन्याच्या अखेपर्यंत या सेंटरच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. या सेंटरमध्ये आजूबाजूची जैवविविधतेची माहिती दिली जाणार आहे. अध्र्या तासाच्या समुद्रसफारीसाठी खास बोटीची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना किनाऱ्यावरील पक्षी, प्राणी यांचे जवळून दर्शन घेता येणार आहे. यासाठी स्थानिक आगरी-कोळी बांधवांना प्रशिक्षण देऊन त्यांची गाईड म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. ही सफारी सशुल्क राहणार असल्याचे कांदळवनाचे मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी स्पष्ट केले.
मुंबईला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे तर ठाण्याला त्यापेक्षा दुप्पट खाडीकिनारा आहे. नवी मुंबईचा हा पट्टा २४ किलोमीटरच्या जवळपास आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी या समुद्रमार्गावर मुंबई-नवी मुंबईला जलवाहतुकीने जोडणारी हॉवरक्रॉफ्ट सेवा सुरू झाली होती. ती कामगारांच्या समस्येमुळे नंतर बंद पडली. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या जलवाहतूक व्हिजनमुळे ती पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याच समुद-विकासाच्या धर्तीवर वनविभागानेही कंबर कसली असून ऐरोली खाडीपूल बांधताना कंत्राटदाराने पुलावर तुळई टाकण्यासाठी वापरलेल्या वीस हेक्टर जमिनीचा आता खुबीने उपयोग केला जाणार आहे. या ठिकाणी कंत्राटदाराने आपल्या कार्यालयासाठी दोन बैठय़ा इमारती बांधलेल्या आहेत. त्याचा उपयोग वनविभाग मरिन इंटरप्रिटेशन सेंटर उभारण्यासाठी करणार आहे. या इमारतींची लवकरच डागडुजी केली जाणार असून यासाठी विविध विभागांकडून निधी घेतला जाणार असल्याचे एन. वासुदेवन यांनी सांगितले. वर्षांअखेपर्यंत या सेंटरचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे. वनविभागाने या ठिकाणी मॅग्रोज नर्सरी, लाकडांची नैसर्गिक जेट्टी उभारली आहे. पर्यटकांना प्लेमिंगो, कोल्हा, विविध प्रकारचे जलचर, सरपटणारे, मासे अशी जैवविविधता जवळून पाहता यावी यासाठी बोटीची व्यवस्था केली जाणार आहे. मुलुंड-ऐरोली खाडी पुलाच्या पूर्व बाजूस पुलाच्या खाली ५०० मीटर अंतर चालून गेल्यानंतर पुलाच्या टोकापर्यंत पर्यटकांना पोहोचता येणार आहे. त्यानंतर वनविभागाच्या वतीने तयार ठेवण्यात आलेल्या बोटीने अध्र्या तासाची फेरी ऐरोली ते बेलापूर या दरम्यान मारता येणार आहे. या बोटीत गाईड म्हणून स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन तयार केले जाणार असून ते या जैवविविधतेची माहिती देणार आहेत. खाडीकिनाऱ्यावर येणाऱ्या भरती- ओहोटीच्या वेळा पाहून हे वेळापत्रक तयार केले जाणार आहे. यामुळे पर्यटन, रोजगार आणि खाडीकिनाऱ्याचे संवर्धन या सर्व गोष्टी साध्य होणार असल्याचे वासुदेवन यांनी सांगितले.
प्रदूषण मुक्त खाडीकिनारा  मोहीम
ठाणे खाडीकिनाऱ्यावर जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे सिडको, नवी मुंबई आणि इतर पालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच प्रदूषण मुक्त खाडीकिनारा ही मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे वासुदेवन यांनी स्पष्ट केले. या प्रदूषणात प्लास्टिकचा मोठा भस्मासुर असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader