ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने वनवणवा नियंत्रणासाठी वनविकास महामंडळास यापूर्वी दिलेल्या ५० लाख रुपयांव्यतिरिक्त आणखी ३६.५ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
तेराव्या वित्त आयोगांतर्गत हे अनुदान आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राप्त झाले होते. यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेतून ४२ लाख व ८ लाख रुपये वनविकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले होते, मात्र, वनविकास महामंडळाची मागणी जास्त असल्यामुळे क्षेत्र संचालकांनी पाठपुरावा करून अनुदान प्राप्त करून घेतले. आता वनविकास महामंडळाकडे मागील वर्षांची शिल्लक २.२५ लाख रुपये अखर्चित धरून असे एकूण ८८.७५ लाख रुपये वनवणव्याच्या व्यवस्थापनासाठी वनविकास महामंडळाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने दिलेले आहेत.
कोळसा येथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व वनविकास महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.
यात वनवणवा व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करून कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी, महाव्यवस्थापक संजय ठाकरे, सुजय दोडल, बी.टी. भगत, एस.व्ही. माडभुषी उपस्थित होते. वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना चारचाकी वाहने जिल्हाधिकारी जोपर्यंत अधिग्रहित करून देत नाही तोपर्यंत आवश्यकतेनुसार भाडय़ाने वाहने लावण्याबाबत क्षेत्र संचालकांनी सुचवले आहे. मध्य चांदा वनविभागाकडील फायर इंजिनही वनवणवा नियंत्रणासाठी वनविकास महामंडळास उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मागील वर्षी सर्वात जास्त नुकसानग्रस्त झालेल्या कोळसा येथे फायर इंजिन तैनात करण्यात येणार आहे. कोळसा येथील वनविकास महामंडळाचे रिक्त असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पदावर नवीन अधिकाऱ्यांची पदस्थापनाही केली आहे व अधिकारी लवकरच त्यांचा पदभार सांभाळतील. या व्यतिरिक्त व्याघ्र प्रकल्पाजवळील इको डेव्हलपमेंट समितीचा सहभागही वनवणवा नियंत्रित करण्याच्या कामात योजलेला आहे. या ग्राम परिसर समित्यांनी नेमलेले सदस्यही वनविभागाच्या व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी मदत करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा