या लेखमालेतला हा शेवटचा लेख. जंगलात फिरताना आलेले अनुभव, वन्यप्राण्यांसोबत काम करतानाचे अनुभव आणि हे सगळं अनुभवल्यानंतर त्याचे मनामध्ये उठलेले तरंग हे सगळं वाचकांसमोर मांडताना स्वत:चं अनुभवविश्वा आणखी समृद्ध होत असल्याचं जाणवत होतं.
‘लोकसत्ता’च्या चोखंदळ वाचकांच्या दाद देणाऱ्या उस्फूर्त प्रतिक्रिया नेहमीच सुखकारक वाटतात. या लेखमालेच्या निमित्तानेदेखील बऱ्याच वाचकांशी संपर्क आला, संवाद साधला गेला आणि अनेकांशी मत्रीचे संबंधदेखील प्रस्थापित झाले. अनेकांकडून त्यांच्या भागात असलेल्या जंगलाला भेट देण्याची सस्नेह आमंत्रणंदेखील आली. २०१० मध्ये ‘लोकसत्ता’साठीच ‘मचाण’ ही लेखमाला लिहित असतानादेखील असाच सुंदर अनुभव आला होता. हे सगळे स्नेहीजन जोडण्यात ‘लोकसत्ता’ची मुख्य भूमिका असल्याने त्यांचे मन:पूर्वक आभार. माणूस हा प्रेमाचा आणि रसग्राहकतेचा भुकेला असतो. या लेखमालेच्यादरम्यान वाचकांनी दिलेलं प्रेम हे मनाला हवहवंसं वाटणारं होतंच, शिवाय अनेक अंगांनी शिकवणारंदेखील होतं, हे मनापासून सांगावसं वाटतं.
‘झाड लावा झाड जगवा’ हे ब्रिदवाक्य म्हणायला जितकं सहजसुंदर आहे तितकंच ते कृतीत उतरवणं कठीण आहे. एक तर ,आपली झाडं जगवायला लागणाऱ्या वेळेची वाट पाहणारी मानसिकता नाही म्हणून किंवा शहरात झाडं लावायला जागाच शिल्लक नसल्यानं झाडं लावण्याचा प्रश्नच येत नाही, तर ते जगवायचा आणि त्याचं संगोपन करण्याचा प्रश्न खूपच दूर आहे. जंगलात परिस्थिती काहीशी बरी आहे, पण तिथंही आपल्याला झाडं बघवत नाहीत. अवैध वृक्षकटाई, गुरेचराई यामुळे जंगलांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे, पण लक्षात कोण घेतो? आपली संवेदनशीलता इतकी हरवली आहे की, वृक्षकटाईचा कुठलाही दृश्य परिणाम नसल्यानं समस्या तितकीशी गंभीर नाही, अशी भूमिका आपण घेतो. जे झाडांच्या बाबतीत तेच पर्यावरणाच्या इतर समस्यांबाबत आणि तेच इतर घटनांबाबत. या लेखमालेतून जंगलाच्या, पर्यावरणाच्या सद्यपरिस्थितीचं वर्णन करताना जंगलात आलेले अनुभव आणि त्याचे मनात उमटलेले पडसाद आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करून बघितला.
वाचकांपकी एकजण तरी पर्यावरण संवर्धनाच्या आमच्या आणि सोसायटी फॉर वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन, एज्युकेशन अँड रिसर्च या निसर्गसंस्थेच्या कार्यात सहकार्य करायला समोर आला तरी लेखमालेचा उद्देश सफल झाला, असं मी म्हणेन.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा