डोंगर-दऱ्यामधील झरे आटल्याने हिरवीगार वनराई शुष्क
पर्यावरण स्नेही
जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात यंदा कमी पावसामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना वनराई जगवायची कशी, अशी समस्या वन व पर्यावरण विभागापुढे आहे. पिण्यासाठी पाण्याला प्रथम प्राधान्य असल्याने वन विभागाची समस्या दुर्लक्षितच राहिली आहे. प्रश्न केवळ झाडे वाचविण्याचा नसून त्याआधारे पर्यावरण चक्रास पूरक भूमिका बजाविणाऱ्या पशु-पक्ष्यांचाही आहे.
लागोपाठ दुसऱ्या वर्षी नाशिकचे गंगापूर धरण पर्जन्याच्या अंतीम टप्प्यात जेमतेम भरले. या पाण्यातून नाशिक शहराची तहान कशीबशी भागविली जाईलही, परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची तहान भागविण्यासाठी प्रशासनाला भगीरथ प्रयत्न करावे लागणार आहेत. जिल्ह्यातील कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, चांदवड, या तालुक्यांमध्ये तर हिवाळ्यातच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गांवाना आज पिण्याच्या पाण्यासाठी भटंकती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत ‘झाडे वाचवा व झाडे जगवा’ चा संदेश केवळ भिंतीवरच राहण्याची शक्यता आहे. जाहीर कार्यक्रमांव्दारे ठिकठिकाणी वृक्षारोपण केले गेले असले तरी त्यांचे संवर्धन होण्याची शाश्वती अतिशय कमी आहे. नव्याने लावण्यात येणाऱ्या झाडांची काळजी घेण्यासह अस्तित्वात असलेली वनराई जगविण्याचे आव्हान वन विभागापुढे आहे. बहुतांश ठिकाणी डोंगर-दऱ्यांमधील झरे आटल्याने परिणामी  हिरवीगार वनराई शुष्क बनली आहे. उत्तर महाराष्ट्रात काही सामााजिक संस्था तसेच पर्यावरणप्रेमी संस्थांकडून या पावसाळ्यात टेकडय़ांवर, माळरानावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. काही ठिकाणी झाडांचे बी टाकण्यात आले. परंतु पाण्याअभावी पर्यावरणप्रेमींचे हे प्रयत्न वाया जाण्याची चिन्हे आहेत.
अलीकडे वृक्षारोपणासाठी ज्या वृक्षांची निवड करण्यात येते, तीच मुळात चुकीची असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांकडून नोंदविण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीत वड, पिंपळ, चिंच, उंबर या वृक्षांना महत्वपूर्ण स्थान आहे. त्यांची पूजाही केली जाते. रस्त्यांचे रूंदीकरण किंवा इतर कामांमध्ये कित्येक वर्षांपासून ठाण मांडलेल्या या वृक्षांची तोड केली जाते  परंतु नव्याने वृक्षारोपण करताना याऐवजी शोभिवंत झाडांना प्राधान्य दिले जाते.
नियमित पाणी न मिळाल्यास ही झाडे निस्तेज होतात. वड, पिंपळ, चिंच या वृक्षांनी एकदा तग धरल्यावर त्यांना कित्येक दिवस पाणी नाही मिळाले तरी ती जगू शकतात. त्यामुळेच जुन्या वृक्षांमध्ये यांचा समावेश अधिक प्रमाणात दिसून येईल. दिवसेंदिवस पाण्याचे कमी होणारे प्रमाण लक्षात घेता या वृक्षांचे रोपण अधिक प्रमाणावर करण्याची गरज आहे.