जंगलामध्ये बैलगाडीतून जाताना समोर वाघ पाहून गाडीवानाची गेलेली वाचा.. हात मागे घेत संत्री सोलून खाणारी विदर्भातील माकडे.. अणुबॉम्ब प्रतिरोधक घरांसाठी वापरण्यात येणाऱ्या रक्तचंदन लाकडाच्या खरेदीसाठी येणारे जपानी.. विदर्भात आढळणारे जांभळ्या रंगाचे चांदीकवडी कबूतर.. चार दशकांच्या जंगलभ्रमंतीतून आलेल्या अनुभवांचे पोतडे मारुती चितमपल्ली यांनी मंगळवारी उघडले आणि त्यांच्या कथनातून ‘वना’चे ‘जीवन’ उलगडले.
अॅड-व्हेंचर फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात मारुती चितमपल्ली यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पूर्वार्धात डॉ. सुहास पुजारी यांनी संपादित केलेल्या ‘मारुती चितमपल्ली- व्यष्टी आणि सृष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे आणि उल्हास पेटकर या प्रसंगी उपस्थित होते.
मारुती चितमपल्ली म्हणाले,‘‘खरे तर मला चित्रकार व्हायचे होते. पण, चित्रकार म्हणजे सिनेमाची पोस्टर रंगविणारा या संकल्पनेतून घरातून विरोध झाल्यामुळे मी वनाधिकारी झालो. पश्चिम महाराष्ट्रातील १५ वर्षांच्या नोकरीनंतर मी स्वत:हून नवेगावबांध येथे बदली मागून घेतली आणि तेथे बारा वर्षे काम केले. आदिवासी साथीदारांसमवेत फिरून अरण्यवाचन केले. पुण्यामध्ये बदली झाली त्या वेळी मी जर्मन, रशियन आणि संस्कृत या भाषा आत्मसात केल्या. वनाधिकारी म्हणून मला रायफल आणि रिव्हॉल्व्हर देण्यात आले होते. पण, मी ही शस्त्रे कपाटात ठेवली. गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, डॉ. सलिम अली यांचा सहवास लाभला. बंदुकीची जागा लेखणी आणि दुर्बिणीने घेतली. पुलं आणि सुनीताबाई हे डॉ. बाबा आमटे, विकास आमटे आणि प्रकाश आमटे यांच्यासह जंगलात आले होते. या दहा दिवसांत मला ज्ञानाचे असंख्य कण मिळाले.’’
‘‘कोकिळ हा पक्षी गातो. पण, कोकिळा गाऊ शकत नाही. तरीही आपण लता मंगेशकर यांना गानकोकिळा म्हणतो हा विरोधाभास नाही का,’’ असा सवाल उपस्थित करून चितमपल्ली यांनी जंगल भ्रमंतीचे अनुभव सांगितले. मोर आणि लांडोर यांचे मीलन पाहण्याचे भाग्य लाभले. वाघाला पाहून वाचा गेलेल्या गाडीवानाला कदाचित हा प्रसंग आठवून त्याची वाचा पुन्हा येईल या आशेपोटी मी दरवर्षी भेटण्यास जात असे. बलुतेदारी नष्ट झाल्यामुळे आणि जंगलातील कमी झालेले पाणी यामुळे गिधाडांच्या संख्येत झपाटय़ाने घट होत आहे. शहरामध्ये येणाऱ्या बिबटय़ांची मीमांसा त्यांनी केली. माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक आहे, हे जाणून घ्यावे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले,‘‘ प्राणी, पक्षी, वृक्ष याबरोबरच माणूस हादेखील सृष्टीचा एक घटक आहे, हे भान माणूस विसरल्याने सृष्टी धोक्यात आली. सृष्टीच्या मुळावर येणार असेल तर असा विकास नको, असे स्पष्टपणे सांगण्याचे धारिष्टय़ असलेल्यांमध्ये चितमपल्ली यांचा समावेश आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा