उरण तालुक्यातील कळंबुसरे इंद्रायणी डोंगर व वशेणी गावाच्या परिसरात बुधवारी सकाळी लागलेल्या वणव्यात शेकडो एकर जंगल जळून भस्मसात झाले आहे. वणवा आटोक्यात आला असला तरी यामध्ये वन्यजीव व प्राण्यांसह येथील शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. वन विभागाकडे आग विझविण्याची साधनसामग्री उपलब्ध नसल्याने अधिक नुकसान झाले आहे, तर हा वणवा नसून जमिनी मोकळ्या करण्याच्या उद्देश्याने जाणीवपूर्वक लावण्यात आलेली आगच असल्याचा आरोप निसर्गमित्र संघटनेने केला आहे.
जंगलात वणवा पेटणे ही उन्हाळ्यातील नित्याची गोष्ट आहे. मात्र जंगलाचे प्रमाण कमी होत असताना जंगल टिकविण्यासाठी वनविभाग साधनसामग्रीयुक्त असण्याचीही गरज आहे. उरणच्या कळंबुसरे व वशेणी परिसरात वणवा लागल्यानंतर आग विझविण्यासाठी गेलेल्या वनसंरक्षकांकडे केवळ काही गोणपाटे व झाडांच्या फांद्या याचाच वापर केला जात होता. त्यामुळे आग विझविण्यात उशीर झाल्याने जंगलात आग भडकली होती. २०१३ मध्ये अशाच प्रकारचा वणवा चिरनेर परिसरात लागला असता काम करून जंगलातच विश्रांती घेणाऱ्या एका वृद्ध महिलेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात उरण वन विभागाचे वनसंरक्षक चंद्रकांत मराठे यांच्याशी संपर्क साधला असता आग विझविण्यासाठी लागणारे साहित्य वनविभागाकडून आलेले नसल्याने पारंपरिक पद्धतीनेच गोणपाट व झाडांच्या फांद्यांचा वापर करून आग विझवावी लागत असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले, तर चिरनेर येथील फ्रेण्डस ऑफ नेचरचे अध्यक्ष व निसर्गमित्र जयवंत ठाकूर यांनी अशा प्रकारचे वणवे हे जाणीवपूर्वक लावले जात असल्याचे मत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा