ठाणे येथील सावरकरनगर भागातील वनजमिनीवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी २५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी येऊर विभागाचे वन अधिकारी नीलेश देविदास चांदोरकर (३७) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी अटक केली.
ठाणे येथील येऊर-उपवन परिमंडळात वन अधिकारी म्हणून नीलेश चांदोरकर कार्यरत असून त्यांच्या कार्यक्षेत्रातील सावरकरनगर परिसरात तक्रारदाराचे वनजमिनीवर घर आहे. तक्रारदाराने या घराच्या पहिल्या मजल्यावर विटांचे बांधकाम करून पत्रे टाकले होते. या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी नीलेश चांदोरकर याने तक्रारदाराकडे सव्वा लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम हप्त्यामध्ये देण्याचे ठरले होते. दरम्यान, याप्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याआधारे या विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी येऊर येथील वन खात्याच्या चेकपोस्ट चौकीजवळ सापळा रचून चांदोरकरला लाचेचा पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विद्युत जोडणीसाठी लाच; दोघांना पकडले
नवीन विद्युत मीटर जोडणीसाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या ढोकाळी विभागाचे साहाय्यक अभियंता चंद्रशेखर देशमुख (५४) आणि साहाय्यक लाइनमन जहांगीर हनीफ मदार (५५) या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांना नवीन विद्युत मीटरची जोडणी घ्यायची होती. मात्र, त्यासाठी चंद्रशेखर आणि जहांगीर या दोघांनी दीड हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.