राज्यातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान तसेच संरक्षित क्षेत्रात भेटीकरिता वन विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी/कर्मचारी तसेच वन विभागात प्रदीर्घ काळ सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या वनअधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना प्रवेश शुल्क, परवाना शुल्क व त्यांच्या वाहनाकरिता प्रवेश शुल्क भरण्यापासून सवलत देण्यात आली आहे.
त्यासंदर्भातले आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने नुकतेच काढले आहेत. २९ जुलै जागतिक व्याघ्र दिनापासून ही सवलत लागू होणार आहे. त्याचवेळी त्यांना काही अटींचेही पालन करावे लागणार आहे.
अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात प्रवेशाकरिता कोटा किती उपलब्ध आहे, यावरून प्रवेश निश्चित करण्यात येतील. एक अधिकारी, कर्मचारी व त्यांच्यासह कुटुंबियांना एक आर्थिक वर्षांत अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात जास्तीतजास्त तीन फेऱ्यांकरिता ही सवलत देय राहील. त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक राहील. ओळखपत्राची छायांकित प्रत अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानाच्या संबंधित कार्यालयात सादर केल्यानंतर या आदेशाप्रमाणे मान्य सवलत देय राहील. अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत त्याच वाहनामध्ये भ्रमण करणारे त्यांचे कुटुंबीय यांना प्रवेशाकरिता परवान्याचे शुल्क भरण्यापासून सवलत राहील. यात त्यांची पत्नी, पती, त्यांची मुले, मुली, आई-वडील, बहीण व भाऊ यांचा समावेश राहील.
कुटुंबातील व्यक्तींसाठी सवलत प्राप्त करण्याकरिता कर्मचाऱ्यांनी अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानाच्या संबंधित कार्यालयात घोषणापत्र सादर करावे लागेल. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश राहणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा