पंधरा वर्षांपूर्वीच्या जांभूळ, बोरीची झाडी, आंब्याची घनदाट आमराई पनवेलमधून आता लुप्त पावल्या आहेत. रानफळांची जागा आता टोलेजंग इमारतीने घेतल्या आहेत. सरकारी पातळीवर पर्यावरणाचे रक्षण नावापुरते कागदावरच राहिले आहे. पर्यावरणाच्या या ऱ्हासात आजच्या पनवेलच्या पिढीने उन्हाळ्यात रानफळ झाडांचा आनंद गमावल्याची खंत त्यांचे पालक व्यक्त करीत आहेत. मुलांचा रानफळांचा आनंदही गेला.. अन् जागतिक तापमानवाढीचे संकटही पनवेलकरांवर ओढवले ही आजची परिस्थिती आहे.
पनवेल गावात सुरुवातीच्या काळापेक्षा अलीकडेच पंधरा वर्षांपूर्वी लाइनआळी, वि. खं. विद्यालयाच्या शेजारील परिसरात, पोदी आणि गावाच्या मध्य ठिकाणी मोठी जांभळाची मोठी झाडे, बोरी आणि चिंचेची झाडे होती. उन्हाळा पडला की मित्रांसोबत भटकत राखणदारांची नजर चुकवत या झाडांवरील फळे चाखत होती. पनवेल गावातून पोदीवर जाण्यासाठी मुलांमध्ये मोठे जिगर लागायचे, कारण येथे घनदाट झाडे होती. खांदा कॉलनीच्या प्रवेशद्वारावर जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या रंग बनविणाऱ्या कंपनीत मोठी आमराई होती. आजमितीला जांभळे ५० रुपये पाव किलो या दराने विकली जातात. त्या वेळी खिशात एक रुपया नसताना मित्रांच्या टोळीसोबत हे विद्यार्थ्यांचे पथक रानफळ खाऊन अर्धा दिवस काढायचे. तळोजा, कामोठे, कळंबोली, रोडपाली, आदई या परिसराला खाडी किनारपट्टी लाभली होती. खाडीमुळे मासेमारी हा शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय होता. खाडीतील चिंबोरी, काळेमासे, कोळंबी हे खाद्यासह उदरनिर्वाहाचे साधन होते. येथील जलचर आणि आंबा, जांभूळ, चिंचेची झाडे आज नष्ट झाली आहेत. आज लाइनआळी परिसरातील त्या रानफळांच्या जागेवर लाइफलाइन रुग्णालय व इतर व्यापारी संकुले उभी आहेत. वि. खं. विद्यालयाशेजारील झाडांची जागा आता काँक्रिटच्या जंगलाने घेतली आहे. नवीन पनवेल पुलाच्या शेजारील औद्योगिक वसाहतीमधील रानफळांची झाडे नष्ट झाल्याने येथे धुरांचे बंब उभे असल्याचे दिसतात. पोदीवरील घनदाट झाडांची जागा आता वन विभागाच्या कार्यालयाने आणि गृहनिर्माण सोसायटय़ांनी घेतली आहेत. रानफळे गेली त्याचसोबत उन्हाळ्याचा पाराही चढला आहे. जागतिक तापमानवाढीच्या संकटाला आज ही रानझाडी मोठा उतारा होती. काळ बदलला आणि सिडकोने तळोजा, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, आदई, तळोजा, रोडपाली या परिसरांतील खाडीवरच मातीचा भराव टाकला आणि उपनगरे वसविली. त्यानंतर विकासासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड पाहायला मिळाली. विकास झाला मात्र तो काही काळांचा होता हे येथील शेतकऱ्यांना समजले. तळोजा परिसरात औद्योगिक क्षेत्र आले, मात्र तेथील कारखानदारांनी खाडीकिनाऱ्याला सांडपाणी सोडण्याचा आधार बनवला. तिथपासून कासाडी नद्यांचे प्रदूषितीकरण सुरू झाले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारदरबारी विभाग आहेत. परंतु येथील अधिकारी पर्यावरणप्रेमींना विकास हवा की निसर्ग, असा सवाल करतात त्या वेळी त्यांच्या बुद्धीजीवी असण्याची कीव सामान्यांना येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest trees are vanishes in panvel
Show comments