प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रबोधनाची रेसिपी
दारिद्रय़ाबरोबरच अंधश्रद्धा, योग्य माहितीचा अभाव आणि एकसुरी आहाराच्या सवयीमुळे ग्रामीण भागात कुपोषणाची समस्या अजूनही कायम असल्याचे लक्षात आल्याने आता ते हटविण्यासाठी स्थानिक पातळीवर मुबलक मिळणाऱ्या रानभाज्यांचा आधार घेण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेने घेतला आहे.
या योजनेत ग्रामपंचायत स्तरावर पाककृती स्पर्धा आयोजित केल्या जाणार असून त्यानिमित्ताने ग्रामीण भागातील महिलांना योग्य आहाराचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात जवळपास सर्वच ऋतूंमध्ये कमी-अधिक प्रमाणात रानभाज्या मिळतात. विशेष म्हणजे कुपोषणाची सर्वाधिक समस्या आढळून येणाऱ्या पावसाळ्यात सर्वाधिक रानभाज्या आढळून येतात. त्याचप्रमाणे रानात निरनिराळी फळेही मिळतात. आदिवासी महिला परंपरागत पद्धतीने या भाज्या करतात. या भाज्यांमधील औषधी गुणही त्यांना ठाऊक असतात. या रानमेव्याचा परिणामकारक वापर कुपोषण मुक्तीसाठी करण्यासाठी तब्बल ५५ लाख रुपये खर्चाची एक विशेष योजना आखण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली.
जिल्ह्य़ातील तलासरी, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, शहापूर, डहाणू, मुरबाड आणि वाडा या तालुक्यांमधील प्रत्येक गावात या योजनेअंतर्गत वर्षांतून दोनदा पाककृती स्पर्धा घेण्यात येतील. त्यानिमित्ताने महिलांचे आहाराबाबत प्रबोधन केले जाणार आहे. एकच एक पदार्थ रोज खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे एकाच भाजी अथवा धान्यापासून निरनिराळे पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षणही यानिमित्ताने त्यांना दिले जाणार आहे. जिल्ह्य़ात कोळा, कारवा, नारळी, शेवळी, चायवळ, रताळ्याचे कोंब, कंद, तेरा, रानकेळी, भारंगी, मुहदोडी, लोत, शेकट, टाकळा, टेंभरण, कुर्डे, भोकर, कुडय़ाची फुले आदी अनेक प्रकारच्या भाज्या पावसाळ्यात आढळतात. त्यातील अगदी थोडय़ा तालुक्याच्या बाजारपेठांमध्ये विक्रीला येतात. मुख्यत्वेकरून पावसाळ्यातच जास्त प्रमाणात आढळून येणारे कुपोषण दूर करण्यासाठी या रानभाज्याच उपयुक्त ठरू शकतील, हे लक्षात आल्याने ही योजना आखण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनी मुरबाडमध्ये श्रमिक मुक्ती संघटनेने आयोजित केलेल्या हिरव्या डोंगराच्या जत्रेत रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धेस खूप चांगला प्रतिसाद मिळाला. परिसरातील महिलांनी २९ रानभाज्यांचे ४२ प्रकार शिजवून आणले होते. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण भावसार या स्पर्धेच्या वेळी हजर होते. रानभाज्यांच्या माध्यमातून जिल्ह्य़ात कुपोषणमुक्ती साधण्याच्या शासकीय अभियानाचे ते समन्वयक आहेत. या स्पर्धेत उल्लेखनीय पदार्थ करणाऱ्या पहिल्या तीन महिलांना रोख रकमेची पारितोषिके तसेच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रबोधनाद्वारे ग्रामीण भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या या योजनेत आरोग्य, शिक्षण तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व घटकांना सामावून घेतले जाणार आहे.

Story img Loader