नवी मुंबई पालिकेने देऊ केलेल्या दोन कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीवर ठाणे वनविभाग नवी मुंबईतील घणसोली येथील एकमेव नैर्सगिक पर्यटन स्थळ गवळी देव व सुलाई देवी या दोन डोंगरांचा विकास करणार आहे. गवळी देव डोंगर विकासाकरिता वनविभागाने पालिकेकडे निधी मागितला असून तो देण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे. नवी मुंबईत हे एकमेव असे ठिकाण आहे ज्याचा विकास पुण्यातील पर्वती डोंगरासारखे होऊ शकणार आहे. पावसाळ्यात या ठिकाणी निर्माण होणारा धबधबा हा अनेकांच्या आर्कषणाचे ठिकाण आहे.
सिडकोने बसविलेल्या नवी मुंबईत नैर्सगिक असे एकही ठिकाण नाही. पारसिक डोंगराचाही सिडकोने व्यावसायिक उपयोग केल्याने या ठिकाणी श्रीमंतांनी बंगले थाटण्याशिवाय या डोंगराचा तसा उपयोग केला नाही. सिडको आगमनापूर्वी घणसोली, तळवली, गोठवली या तीन गावांतील गाई-गुरे चरण्याचे ठिकाण म्हणून गवळी देव डोंगराचा वापर केला जात आहे. त्या ठिकाणी गुराख्यांनी श्री गणेश आणि श्री कृष्ण या देवातांची प्राणप्रतिष्ठा करून पूजा सुरू केलेली आहे. त्यामुळे या डोंगराला महत्त्व प्राप्त झालेले आहे. मफतलाल समूहाच्या नोसिल कपंनीने हा डोंगर भाडेपट्टय़ाने घेऊन विकसित केला असून त्या ठिकाणी पाच लाख झाडांचे संवर्धन केले आहे. नोसिल बंद पडल्यानंतर या डोंगराची अक्षरश: वाताहत झाली होती. नेसिलने विकसित केलेल्या गवळी देव डोंगराचा पालिकेने विकास करावा अशी मागणी नवी मुंबईकरांकडून सातत्याने केली जात होती. आमदार संदीप नाईक यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार पालिकेने ठाण्याचे वनसंरक्षक कार्यालयाकडे हा डोंगर भाडेपट्टय़ावर देण्याची मागणी केली होती पण वनविभागाने ती नाकारली. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील या डोंगराचा विकास व्हावा असे वाटत असेल तर आम्हाला निधी द्या तो आम्ही तुमच्या पद्धतीने खर्च करू असे वनविभागाने पालिकेला कळविले होते. त्यासाठी या डोंगराचा पर्यटन म्हणून विकास करताना तेथे लागणारी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गार्बियन पद्धतीने डोंगरांच्या कडे-कपारींचे संरक्षण, डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी लागणाऱ्या शेकडो पायऱ्या, विहिरी, तलावांची स्वच्छता, पर्यटन विश्रांतीकक्ष, बसण्याच्या व्यवस्था अशा सुविधा लागणार असून त्यावर तीन कोटी ७० लाख रुपये खर्च होणार असल्याचे वनविभागने कळविले होते. त्याची पालिकेच्या अभियंता विभागाने खातरजमा करून या सुविधा दोन कोटी ८४ लाख रुपये खर्चात होतील असे स्पष्ट केले.
त्यामुळे त्याला वनविभाने आता सहमती दिली असून पालिकेने नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत या खर्चाला मंजुरी घेतली आहे. त्यामुळे वनविभागाला टप्प्याटप्प्याने त्यांच्या कामानुसार हा निधी वर्ग केला जाईल असे पालिकेचे कार्यकारी अभियंता शंकर पवार यांनी सांगितले आहे. या खर्चात जवळच असणाऱ्या सुलाई देवी डोंगराचाही विकास केला जाणार असून त्यावर एक कोटी आठ लाख रुपये खर्च केले जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा