भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आणि माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांमागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ‘टीएमटी’ सभापतीपदाच्या निवडणुकीत दगाफटका होताच शिवसेना तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाटणकर यांना चोपले, शिवाय उपमहापौर कार्यालयाची तोडफोडही केली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात पाटणकर यांचे अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ठाण्याचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करताच महापालिकेतील कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. पाटणकर यांचा राजीनामा ज्या पद्धतीने घेण्यात आला, त्यावरून हे पत्र कोणत्या कार्यालयात तयार करण्यात आले याचा तपासही गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत. त्यामुळे राडेबाजांना प्रोत्साहन देणारे नेते मोकाट फिरत असले तरी कर्मचाऱ्यांवर मात्र चौकशीचे बालंट आले आहे.
‘टीएमटी’ सभापतिपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर स्वपक्षीय नेत्यांनी मिलिंद पाटणकर यांना मारहाण करून त्यांच्या कार्यालयाची मोडतोड केली. त्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होते. या घटनेनंतर पाटणकर बेपत्ता झाले. दरम्यान, ठाण्यात पुन्हा परतताच पाटणकर यांनी याप्रकरणी नौपाडा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यात आपणास अपहरण करून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानुसार, नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाटणकर यांच्या तक्रारीनुसार नौपाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या प्रकरणात नौपाडा पोलिसांच्या तपासातील मर्यादा लक्षात येताच हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग होताच तपासाला वेग आला असून पोलिसांनी महापौर आणि उपमहापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचा सपाटा लावल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. उपमहापौर कार्यालयात पाटणकर यांना मारहाण तसेच कार्यालयाची तोडफोड झाली होती. याच कार्यालयात जबरदस्तीने उपमहापौर पदाच्या राजीनाम्यावर सही घेण्यात आली होती, असा आरोप पाटणकर यांनी तक्रारीत केला आहे. त्यामुळे घटनेच्या दिवशी महापालिका कार्यालयात हजर असलेले अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटनाक्रमाविषयीची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या चौकशीत घटनाक्रम आणि पाटणकर यांच्या उपमहापौर पदाच्या राजीनाम्याचे पत्र कोणत्या कार्यालयात तयार करण्यात आले याविषयी पथकाने सविस्तर चौकशी केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधला असता, मिलिंद पाटणकर यांनी दिलेल्या तक्रारीमधील सर्व बाबींचा सविस्तर तपास करण्यात येत असून ही घटना महापालिकेत घडली आहे. त्यामुळे या घटनेचा सविस्तर माहिती तसेच आढावा घेण्यासाठी महापालिकेतील संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्याकडे विचारपूस करण्यात येत आहे. त्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात येत नाही. तसेच राजीनामा लेटर कोणत्या कार्यालयात तयार करण्यात आले, याचाही शोध सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
राडेबाज मोकाट, कर्मचाऱ्यांवर मात्र चौकशीची संक्रांत
भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आणि माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांमागे पोलीस
First published on: 17-01-2014 at 07:26 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former deputy mayor milind patankar beaten case