कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते जगदीश शेट्टर यांनी बुधवारी सायंकाळी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. समवेत त्यांच्या पत्नी शिल्पा, उद्योगपती राम नाईक होते.
बसवेश्वरांच्या कार्यक्रमासाठी शेट्टर पुणे येथे आले होते. तेथून ते राळेगणसिद्धीला आले. बसवेश्वराची प्रतिमा भेट देऊन त्यांनी हजारे यांचा सत्कार केला.
जनलोकपाल विधेयकासाठी आग्रही भूमिका घेऊन हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला भाग पाडल्याबद्दल शेट्टर यांनी हजारे यांची मुक्तकंठाने स्तुती केली. या विधेयकामुळे भ्रष्टाचाराला मोठय़ा प्रमाणावर आळा बसू शकेल, असा आशावाद व्यक्त करतानाच हजारे यांनी राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल, ग्रामसभांना अधिकार अशा कायद्यांसाठी हाती घेतलेल्या आंदोलनासही यश येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामसभांबाबत कर्नाटकात घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती शेट्टर यांनी हजारे यांना दिली. संसदेपेक्षा जनसंसद श्रेष्ठ असून ग्रामसभेला अधिकार मिळून सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली. शेट्टर यांनी कुटुंबीयांसह यादवबाबा मंदिरास सर्वप्रथम भेट दिली. पद्मावती मंदिर, मीडिया सेंटर, पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केल्याचे हजारे यांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांनी सांगितले.