नवेगाव आंदोलनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांचे रविवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगलीतील शांतिनिकेतन परिवारावर शोककळा पसरली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
    डॉ. पी.बी.पाटील यांनी १९५८ मध्ये नवभारत शिक्षण मंडळाची स्थापना करून शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला. या ठिकाणी पारंपरिक शिक्षणाबरोबरच पंचायत राज प्रशिक्षण, लोककला, संगीत यांचे शिक्षण देण्यात येते. विद्यार्थिदशेपासून सेवादलाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. आचार्य जावडेकर, बॅ. बाळासाहेब खर्डेकर, एम.आर.देसाई, डॉ. जे.पी.नाईक, यशवंतराव चव्हाण, रावसाहेब पटवर्धन, लेफ्ट. जन. एस.पी.पी.थोरात, डॉ. वसंतदादा पाटील यांच्यासोबत सामाजिक कार्याचा वसा त्यांनी अंगीकारला होता. विनोबा भावे व महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नवेगाव ही चळवळ त्यांनी सुरू केली.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ते संस्थापक सदस्य होते. या शिवाय पंचायत राज मूल्यमापन समितीचे अध्यक्ष होते. १९७२ मध्ये सांगली मतदारसंघातून त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्वही केले होते. त्यांना अमरावतीच्या शिवाजी लोक विद्यापीठाने २००२ मध्ये डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले होते. या शिवाय समाजभूषण, मराठाभूषण, सांगलीभूषण आदींसह विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांचे कालप्रदक्षिणा (काव्यसंग्रह), क्रांतिसागर (कादंबरी), समाज परिवर्तन (वैचारिक लेखसंग्रह), नवेगाव आंदोलन (माहिती पुस्तिका), विचारधन : जन-गन-मन (३ खंड) आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
    मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री डॉ.पतंगराव कदम आदींनी शांतिनिकेतन लोक विद्यापीठात जाऊन डॉ. पी.बी.पाटील यांच्या पाíथवाचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.  सायंकाळी बुधगाव (ता. मिरज) येथे उभारण्यात आलेल्या सरोज उद्यानात त्यांच्या पाíथवावर अंत्यविधी करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा