माटुंग्याच्या ‘वीर जिजामाता तंत्रशिक्षण संस्थे’च्या (व्हीजेटीआय) विद्यार्थ्यांनी एकआसनी फॉर्म्युला रेस कार तयार केली आहे. ‘सी इंडिया’तर्फे आयोजित ‘सुप्रा’ या राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत ही कार सहभागी होणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती आणि ज्ञानाला आव्हान देणाकरिता या स्पर्धेचे आयोजन केले जाते. चेन्नई येथे १६ ते २० जुलै दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत ही कार तयार करणारा व्हीजेटीआयचा २५ विद्यार्थ्यांचा चमू सहभागी होणार आहे. याआधी व्हीजेटीआयने ‘बाजा’ या ऑफ रोड रेसिंग कारच्या स्पर्धेत आपली कार सहभागी केली होती.
या कारसाठी ५०० सीसी रॉयल एनफिल्ड डेझर्टस्टॉर्म इंजिन वापरण्यात आले आहे. इंजिनाची कार्यक्षमता आणि इंधनाचा वापर या दृष्टीने विद्यार्थ्यांनी या कारमध्ये बदल केल्याने ही कार स्पर्धेत निश्चितपणे वेगळी ठरेल, अशी अपेक्षा ही कार तयार करणाऱ्या ‘मोटरब्रीद’ नामक व्हीजेटीआयच्या चमूचा कॅप्टन आकाश छावछारिया याने व्यक्त केली. या कारची चेसीसही विद्यार्थ्यांनीच तयार केली आहे. या शिवाय हायड्रॉलिक ब्रेक्स यंत्रणा हे या कारचे वैशिष्टय़ असणार आहे. या शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने या कारला पासवर्ड असलेले इलेक्ट्रॉनिक इंजिन बसविण्यात आले आहे.
केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कारमागील तंत्राला वाव मिळावा अशा व्यावसायिक दृष्टिकोनातून ही कार तयार केली आहे. प्रा. पी. ए. वानखेडे, डॉ. एम. व्ही. तेंडोलकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले आहे. या शिवाय कार तयार करण्यात अण्णा शेट्टी आणि मंगेश धुरी यांनीही विद्यार्थ्यांना सहकार्य केले. ही कार तयार करण्यासाठी साधारणपणे ६ लाख ३० हजाराच्या आसपास खर्च आला आहे. त्यापैकी अर्धा खर्च विद्यार्थ्यांनी प्रायोजकांच्या मदतीने कसाबसा तोलून धरला आहे. मात्र, उर्वरित खर्चाकरिता विद्यार्थ्यांना प्रायोजकांची गरज आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा