समर्थ रामदासांच्या चरित्रातील केवळ घटनाक्रम वा कथा आपल्याला वाचून चालणार नाही तर, त्या घटनांमागील सूत्रे लक्षात घेणे महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत धुळ्याचे प्रकाश पाठक यांनी केले आहे. येथील दासबोध अभ्यासार्थी मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त परशुराम साईखेडकर नाटय़गृहात ‘श्री समर्थ चरित्र’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प शुक्रवारी पाठक यांनी गुंफले.
छोटय़ा नारायणाचे बालपणातील वागणे, चिंता करितो विश्वाची असे म्हणणे, लग्नाच्या बोहोल्यावरून पळून जाणे या सर्व घटनांमागे तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तिला अनुकूल करण्याकरिता केलेले चिंतन व कृती दिसते. त्यातील सूत्रे ही तत्कालीन नसून सार्वकालीन आहेत. समाजातील अत्याचार, क्रूरता व राक्षसी वृत्ती नाहीशी करण्यासाठी विरक्तता व सशक्तता दोन्ही असावी लागते, असे पाठक यांनी नमूद केले. समर्थाचा जन्म ते नाशिक टाकळी येथे आगमन इथपर्यंतचा जीवनपट पाठक यांनी उलगडून दाखविला. प्रारंभी लता वाघ, स्वप्ना जोशी, शशिकांत कुलकर्णी यांनी भक्तिगीते म्हटली. संगीत साथ संजय अडावदकर, शशिकांत बावरेकर यांनी केली. अभ्यासार्थी प्रतिनिधी जयंत उपासणी, वैशाली पाठक यांचा परिचय स्वाती पाठक यांनी करून दिला. सूत्रसंचालन मंडळ प्रमुख डॉ. सुरेश पाठक यांनी केले. व्याख्यानमाला २८ जुलैपर्यंत सुरू राहणार असून सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत व्याख्याने होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा