जुन्नर तालुक्यातील किल्लेसंवर्धनासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माझा गड माझा अभिमान’ या अभियानात सर्व किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम रविवार, २५ नोव्हेंबरपासून राबविण्यात येणार आहे.
स्वच्छता प्रारंभ जुन्नर येथील शिवछत्रपती शिवजन्मभूमी शिवनेरी येथून होणार आहे. तसेच तेथे नेहमी स्वच्छता राहावी यासाठी शिवनेरी स्वच्छता समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत सर्व युवक व राष्ट्रवादी युवक काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते दर तीन महिन्याला शिवनेरीवर साफसफाई मोहीम राबविणार आहेत. शिवनेरी व जुन्नर तालुक्याचे पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने नेहमीच आमदार वल्लभशेठ बेनके यांची भूमिका अग्रेसर राहिली आहे. पण किल्ले आणि त्यांची स्वच्छता, ते जतन करण्याचे काम आम्ही युवकांमार्फत करणार आहोत, अशी माहिती युवा नेते अतुल बेनके यांनी  दिली.
ते म्हणाले, की छत्रपती आपल्या सर्वाचे दैवत आणि आपले प्रेरणास्थान आहे. त्यांना जय शिवाजी, जय भवानी या घोषणेपुरते मर्यादित न ठेवता त्यांनी उभारलेल्या, निर्माण केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू आम्ही जतन करण्याचे काम करणार आहोत.
त्याप्रमाणे लेण्याद्री, ओझर, नारायणगड, चावंड किल्ला तालुक्यातील अन्य पर्यटनस्थळे आहेत. तेथे स्वच्छता अभियान या मोहिमेंतर्गत सर्व शिवप्रेमी युवकांनी या अभियानात सामील व्हावे असे आवाहन युवा नेते अतुल बेनके यांनी केले आहे.
अभियानाच्या नियोजनप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद लेंडे, युवा नेते अतुल बेनके, तालुका युवक अध्यक्ष सुजित खैरे, तालुका प्रवक्ते भरतकुमार तांबे, शिवप्रेमी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘माझा गड माझा अभियान’ यात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी राष्ट्रवादी युवक कार्यालय, नारायणगाव, सूरज वाजगे ९८९०४७१७५५, प्रवीण मुळे ९७६७९७५६७४ यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा