अनेकदा शाळेतील विद्यार्थ्यांना टाकाऊतून टिकाऊ स्वरूपाच्या वस्तू बनविण्याचा एक कार्याभ्यास प्रकल्प म्हणून दिला जातो. कल्याणमधील अण्णाभाऊ साठेनगरमधील मुलांच्या दृष्टीने कचरा हा टाकाऊ नसून उलट तो त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचे साधन आहे. रोजचे जगणे अधिक सुसह्य़ व्हावे म्हणून नियमितपणे काही तास कचरा वेचण्याचे काम करणारी मुले जेव्हा हौसैने दिवाळीचा किल्ला बनवायला घेतात, तेव्हाही त्यासाठी लागणाऱ्या वस्तू जमविण्यासाठी डम्िंपग ग्राऊंडवरच येतात. कारण कचरा हेच त्यांचे विश्व आहे. डमपिंग ग्राऊंडलगतच्या या वस्तीतील मुलांशी अनौपचारिक शिक्षणाच्या निमित्ताने गेली सात वर्षे ऋणानुबंध जोडणाऱ्या अनुबंध समूहाच्या वतीने शनिवारी संध्याकाळी दिवाळी साजरी केली. तेव्हा साठेनगरमधील मुलांनी कचऱ्यातील वस्तूंपासून किती चांगल्या प्रतीचे किल्ले बनविले जाऊ शकतात, हे दाखवून दिले. त्या किल्ल्यांचे परीक्षण करून त्यातील लक्षवेधी ‘गडकरीं’चा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.  
कल्याणमधील के.एम.अगरवाल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिक्षक आणि विश्वस्तांनी २००५ पासून अनुबंध या समूहगटाद्वारे आधारवाडी डम्िंपग ग्राऊंडजवळील अण्णाभाऊ साठेनगर वसाहतीत अनौपचारिक शिक्षण देणारे वर्ग सुरू केले. गेल्या काही वर्षांपासून साठेनगरमध्ये दिवाळी फराळ, सामूहिकपणे फटाके वाजविणे, किल्ले, रांगोळी, कंदील स्पर्धा भरविल्या जातात.
यंदाही दिवाळीनिमित्त अनुबंधने आयोजित केलेल्या स्पर्धेस येथील मुले-मुली उत्साहाने सहभागी झाले. कचऱ्यातच सापडणारे दगड, जुन्या वस्तू आणि प्लॅस्टिक वापरून त्यांनी एकूण २६ किल्ले तयार केले. जाएंट्सच्या सहेली समूहाने या किल्ल्यांचे परीक्षण करून त्यातील रवी साबळे, रवी घुले आणि अरुण जगताप यांचा लक्षवेधी किल्ले बनविल्याबद्दल अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके दिली. रांगोळी स्पर्धेत १५ रांगोळी चित्रे काढण्यात आली होती. डॉ. महेश भिवंडीकर, रेखा भिवंडीकर, ‘सहेली’च्या शांता रामनाथन, सूर्यकांत कोळी, विशाल जाधव, मुलांचे पालक या दिवाळी महोत्सवात सहभागी झाले होते.