* वाहतुकीचे नियम कल्याण-डोंबिवलीत धाब्यावर
* आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
नियमानुसार रिक्षातून फक्त तीन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी असताना कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालक मात्र खुलेआम एका रिक्षातून चार ते पाच प्रवाशांची ने-आण करत आहेत. रिक्षातील चौथ्या आणि पाचव्या प्रवाशाच्या वाहतुकीमागे कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
एका वेळेस रिक्षातून चार ते पाच प्रवाशांची वाहतूक ही शेअर रिक्षा पद्धतीत जास्त प्रमाणात होत आहे. दिवसा किंवा दुपारी रिक्षाचालकाच्या शेजारी एक प्रवासी तर रात्रीच्या वेळेस एक किंवा दोन प्रवासी बसवले जात आहेत. वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या नाकावर टिच्चून रिक्षाचालक उघडपणे अशी बेकायदा वाहतूक करत असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याने कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांसाठी वाहतुकीचे काही वेगळे नियम केले आहेत का, असा सवाल सुजाण प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
एका वेळेस चार ते पाच प्रवाशांची वाहतूक केल्यामुळे रिक्षाचालकाला ३२ ते ४० रुपये मिळत आहेत. साहजिकच एखादा प्रवासी आपल्या कुटुंबासह (तीन जण) जरी रिक्षात बसला तरी रिक्षाचालक मीटर डाऊन न करता शेअर भाडय़ानुसार २४ रुपये घेत आहेत. याचा परिणाम मीटर डाऊन करण्यावरही होत आहे. मीटर डाऊन केल्यास किमान भाडय़ापोटी रिक्षाचालकाला फक्त १९ रुपये मिळतील तेथे चार ते पाच प्रवाशांकडून प्रत्येकी ८ रुपये या प्रमाणे भाडे मिळत असल्याने रिक्षाचालकही त्यालाच प्राधान्य देत आहेत. अर्थात या सर्व प्रकारात रिक्षाचालकांबरोबच प्रवासीही तेवढेच दोषी आहेत.
मोटारसायकल किंवा अन्य दुचाकी वाहनांवर दोनपेक्षा जास्त माणसे बसली तर वाहतूक पोलीस तातडीने दंडात्मक कारवाई करतात, मग रिक्षाचालकांसाठी वेगळा नियम का, असा प्रश्नही प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
डोंबिवलीतील विविध रिक्षातळांवर काही रिक्षाचालक-मालक संघटनांकडून त्यांचा एक कार्यकर्ता उभा केलेला असतो. रिक्षा संघटनेच्या नेत्यांनी त्यालाही सूचना देऊन एका रिक्षात तीनपेक्षा जास्त प्रवासी बसणार नाहीत, याची काळजी घ्यावी, रिक्षा संघटनेच्या नेत्यांनी तसेच वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांनीही प्रत्येक रिक्षातळावर तीनपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करू नये, असे रिक्षाचालकांना आवाहन करणारे फलक लावावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
पोलिसांची कारवाई कधी?
चार ते पाच प्रवाशांची बेकायदा वाहतूक करूनही कोणतीही दंडात्मक कारवाई होत नसल्याने रिक्षाचालकांचेही फावले आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी या विरोधात धडक कारवाई करण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दिवसा, दुपारी किंवा रात्री वाहतूक पोलिसांनी गल्लीबोळात उभे राहून अशी बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात रस्त्यावर उतरून धडक कारवाई करण्यास सुरुवात करावी. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिक्षाचालकाकडून रीतसर पावती फाडून दंड वसूल करावाच, पण त्या रिक्षाचालकाच्या रिक्षाचा क्रमांक आरटीओकडेही कळवावा, म्हणजे आरटीओकडूनही कारवाई केली जाईल. अशी धडक मोहीम काही दिवस राबवली तर या बेकायदा वाहतुकीला आळा बसेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा