राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हय़ात खासदार गोपीनाथ मुंडे विरुद्ध सारे असे समीकरण सुरू केले असताना मुंडे यांनी मात्र खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर यांना बरोबर घेत पश्चिम महाराष्ट्रात भक्कम राजकीय तटबंदी केली. खान्देश आणि विदर्भातील काही राजकीय हिरेही गळाला लावले. भगवानगडावर पुण्यतिथी कार्यक्रमाला मराठा आरक्षणासाठी ३५ संघटनांचे नेतृत्व करणारे संभाजीराजे भोसले, भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करुन सरकारविरोधी नेते आणि पक्ष संघटनांची मजबूत राजकीय मोट बांधण्यास सुरुवात केली असल्याचे दिसते.
बीड लोकसभा मतदारसंघात मुंडे यांना कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व शक्ती पणाला लावली. मात्र, अजून त्यांना सक्षम उमेदवार मिळत नाही; परंतु मुंडे यांनी राज्यात आघाडी सरकारविरुद्ध मजबूत राजकीय मोट बांधण्याचा यशस्वी प्रयत्न चालवला आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटना, तसेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीबरोबर घेऊन तटबंदी मजबूत केल्याचे मानले जात आहे.
खान्देश व विदर्भातील काही राजकीय हिरेही गळाला लागले आहेत. त्यांचाही लवकरच महायुतीत समावेश होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्याच्या राजकारणातील ४० वर्षांचा अनुभव पणाला लावून राजकीय तडजोडी मुंडे करीत असल्याचे दिसत आहे. शेट्टी व जानकर यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या ५ जागांवर फायदा होण्याची शक्यता आहे. सोलापुरातही महायुतीच्या मोहाचा प्रताप निश्चित झाल्याने राष्ट्रवादीला झटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोकणातही ओबीसीच्या मुद्दय़ावर कायम मुंडेंना साथ देणारे शेतकरी नेतेही महायुतीच्याच बाजूने आहेत, तर भगवानगडावर होणाऱ्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त मराठा आरक्षणसाठी विविध ३५ संघटनांना एकत्रित करून नेतृत्व करणारे संभाजीराजे भोसले यांना निमंत्रित केले आहे.
भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, तसेच राष्ट्रवादीत असूनही पक्ष नेतृत्वाच्या भूमिकांनी अस्वस्थ असलेले बांधकाममंत्री छगन भुजबळही कार्यक्रमास येणार आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, छावाचे गंगाधर काळकुटे, संभाजी राजे यांच्याबरोबर आहेत. मेळाव्यातून नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव मुंडे यांनी सुरू केल्याचे दिसते.
राष्ट्रवादीविरुद्ध मुंडेंची तटबंदी!
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हय़ात खासदार गोपीनाथ मुंडे विरुद्ध सारे असे समीकरण सुरू केले असताना मुंडे यांनी मात्र खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर यांना बरोबर घेत पश्चिम महाराष्ट्रात भक्कम राजकीय तटबंदी केली.
First published on: 17-01-2014 at 01:58 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fortifications against ncp by gopinath munde