गडकिल्ले आणि पर्यावरण संवर्धनार्थ कार्य करणाऱ्या येथील शिवकार्य गडकोट मोहीम या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन पिंपरी (पुणे) येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आचार्य अत्रे सभागृहात आयोजित कार्यक्रमात संभाजीराजे भोसले, अशोक हांडे, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते ‘शिवदुर्ग अस्मिता’ पुरस्काराने गौरविण्यात आले. शिवकार्य गडकोट मोहीम या संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, मुख्य संयोजक आनंद बोरा, पक्षीमित्र भीमराव राजोळे, दर्शन घुगे, आशिष बनकर, गणेश जाधव, सागर बनकर आदींनी पुरस्कार स्वीकारला.
यावेळी व्यासपीठावर भोसल, हांडे, बलकवडे यांच्यासह प्रा. नितीन बानगुडे पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रमुख श्रमिक गोजमगुंडे, राष्ट्रीय कीर्तनकार रोहिदास महाराज, एकनाथ पवार, शाहीर दिलीप सावंत, रमेश वाघ, पराग मते आदी उपस्थित होते. भोसले यांनी यावेळी महाराष्ट्र शासनाकडून गडकिल्ल्यांच्या संवर्धनाविषयीच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. राजस्थान सरकार किल्ल्यांसाठी कोटय़वधी रूपये खर्च करत असताना महाराष्ट्र सरकार मात्र किल्ल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शिवरायांचे गडकिल्ले हा आपला भावनिक विषय असून किल्ल्यांच्या संवर्धनाआड येणारे सर्व अडथळे दूर केल्याशिवाय आपण राहणार नाही. त्यासाठी दुर्गसंवर्धकांनी आपणास साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
प्रा. बानगुडे पाटील यांनी गडकिल्ले आणि दुर्गसंपत्ती ही आपणा सर्वाची प्रेरणास्थळे असल्याचे ओळखून ब्रिटीशांनी सुरूंगाच्या सहाय्याने किल्ल्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या, मार्ग उद्ध्वस्त केल्याचे सांगितले.
ज्या किल्ल्यांच्या साक्षीने शिवरायांनी महाराष्ट्र घडवला. ज्या किल्ल्यांच्या साक्षीने शिवरायांनी स्वराज्यासाठी बलिदान देणारे स्वामीनिष्ठ सहकारी घडविले. त्यांच्याकडेच आज महाराष्ट्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील किल्ले आज भग्नावस्थेत असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी आपण दुर्गसंवर्धकांना नेहमीच सहाय्य करणार आहोत. अशा दुर्गवेडय़ा कार्यकर्त्यांना घडविण्याची गरज प्रा. बानगुडे पाटील यांनी मांडली.
याप्रसंगी दुर्गसंवर्धनार्थ सातत्यपूर्ण कामगिरी करणारे कार्यकर्ते, शाहीर, मंडळे, महिला पोवाडेकार, बाल पोवाडेकार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘सह्याद्रीची धारातीर्थे’ या पोवाडय़ाच्या सीडीचे तसेच बानगुडे पाटील यांच्या किल्ले संवर्धन विषयावरील व्याख्यानाच्या सीडीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Story img Loader