स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लातूर शाखेतर्फे स्वामी विवेकानंदांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. या वेळी वृक्षलागवडीचा संकल्प करून स्थापनादिन आगळय़ा पद्धतीने साजरा करण्यात आला.
स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त विवेकानंद संस्कार संस्थेतर्फे विवेकानंद चौकातील स्वामी विवेकानंदांच्या अर्धपुतळय़ाचे नित्यपूजन करण्यात येत आहे. ९ जुलै हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस राष्ट्रीय छात्रदिन म्हणून साजरा केला जातो. स्वामीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त १५० विद्यार्थ्यांनी स्वामीजींच्या पुतळय़ाचे पूजन करावे, असा विचार समोर आला. अभाविप लातूर शाखेतर्फे त्याची रचना केली गेली. सर्व महाविद्यालयांत तसा निरोप गेला. या उपक्रमास विद्यार्थी-विद्याíथनींनी चांगला प्रतिसाद देत विवेकानंद चौकात गर्दी केली व गुलाबपुष्प वाहून विवेकानंदांना अभिवादन करण्यात आले.
दयानंद, शाहू, बसवेश्वर, कोळपा येथील एमडीए रूप ऑफ इन्स्टिटय़ूट आदी महाविद्यालयांत विद्यार्थी-विद्याíथनी स्वामी विवेकानंदांना आदरांजली वाहण्यास उपस्थित होते. देशभरातील २० लाख विद्यार्थ्यांनी वृक्षलागवडीचा संकल्प सोडल्याची माहिती नीलेश कदम यांनी दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या घरासमोर, परिसरात वृक्षारोपण करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
नंदकुमार बिजलगावकर, शुभम होळदांडगे, सूरज मोहिते, गुरुराज कुलकर्णी, शहरमंत्री सारंग हिप्परगेकर, श्रद्धा मराठे आदींनी यात सहभाग नोंदवला. एमडीए ग्रुपचे प्राचार्य पुष्पराज खुब्बा, उदय खामकर यांनी छात्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अभाविपचे संघटनमंत्री प्रवीण गायकवाड, विवेकानंद संस्कार संस्थेचे प्रकाश पाठक, अनिल महाजन, प्रफुल्ल कुलकर्णी यांची उपस्थिती होती.