महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी, काँग्रेस आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या दिशेने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एकूणच पक्षीय बलाबल आणि अपक्षांची मानसिकता लक्षात घेता राष्ट्रवादीचा महापौर होऊ शकतो, त्यादृष्टीने माजी महापौर तथा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांच्यासह पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांचे पुतणे अभिषेक कळमकर यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र अपक्षांची मोट बांधण्याची क्षमता लक्षात घेता जगताप यांचे पारडे जड मानले जाते.
येत्या दि. ३१ डिसेंबरला सध्याच्या मनपाची मुदत संपते. त्यापूर्वी महापौर, उपमहापौर निवडीने नवे सभागृह अस्तिवात येईल. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून, काँग्रेस आघाडीची बैठक सोमवारी रात्रीच बोलवण्यात आली आहे. भाजप-शिवसेना युतीत मात्र सत्ता स्थापनेबाबत सावध हालचाली सुरू आहेत.
मनपात राष्ट्रवादीला १८, काँग्रेसला ११, शिवसेनेला- १७, भाजपला ९, मनसेला ४ जागा मिळाल्या असून ९ अपक्ष विजयी झाले आहेत. या अपक्षांवरच सत्तेची सूत्रे ठरतील, त्यातही राष्ट्रवादीचेच पारडे जड दिसते. या अपक्षांपैकी स्वप्नील शिंदे, कुमार वाकळे हे तसेच अन्य तिघे अनिता भोसले, नसीमा शेख व कुरेशी असे पाचजण राष्ट्रवादीबरोबरच जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर त्यांची संख्या ३४ होते, बहुमताचा ३५ चा जादूई आकडा ओलांडण्यास त्यांना आणखी दोघांचीच गरज असून अन्य दोन पुरस्कृत अपक्ष आणि मनसे यांचाही पाठिंबा मिळवून राष्ट्रवादी थेट ३९, ४० जागांपर्यंतही जाऊ शकते.
 महापौर, उपमहापौर आणि कर्डिले…
निवडणुकीत भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राष्ट्रवादी, काँग्रेसमधील नातेसंबंधांवरून युतीतच बरीच चर्चा झाली. आता काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यास महापौरपदी त्यांचे धाकटे जावई (राष्ट्रवादी) आणि उपमहापौरपदी थोरली कन्या (काँग्रेस) असेही होऊ शकते, त्याचीच शहरात चर्चा सुरू आहे. 

Story img Loader