चौक सुशोभीकरणाचा बोजवारा
* शहर हरितक्रांतीच्या उद्देशाला हरताळ
* ठाणेकरांमध्ये नाराजी
* हरितपथांवर खर्च..चौक दुर्लक्षित
ठाणे शहराच्या अनेक भागांमध्ये असलेल्या कारंजीयुक्त देखाव्यांचे सध्या पाणीपुरवठा आणि देखरेखीअभावी पडीक जागेत रूपांतर झाले असून सुशोभीकरणाच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या बांधकामांमुळे उलट शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या शहर हरितक्रांतीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे, महापालिकेतील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातील चौकांचेही तीनतेरा वाजले असून काही चौकांना तर अनधिकृत बॅनरचे अतिक्रमण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये सुशोभीकरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आकर्षित असे देखावे उभारण्यात आले आहेत. या देखाव्यांच्या सौंदर्यात अधिक भर पडावी म्हणून त्यात विविध ठिकाणांहून पाणी प्रवाहित करून आकर्षक दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्षात देखावा उभारण्यात आल्यानंतर काही दिवसांतच कारंजे बंद पडले. काही दिवे चोरीला गेले. तसेच नादुरुस्त दिवे बदलण्यात आले नसल्यामुळे शहरातील बहुसंख्य देखाव्यांचे अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. या सर्व प्रकारांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच या देखाव्यांवर खर्च करण्यात आलेले लाखे रुपये पाण्यात गेल्याचे दिसत आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये उभारण्यात आलेले हे देखावे आता नागरिकांच्या समस्येचा भाग बनू लागले आहेत. कारण पडीक झालेले हे देखावे उंदीर, कुत्री आणि माजरांचे आश्रयाचे ठिकाण बनले आहेत. पावसाळ्यात देखाव्यांच्या खोलगट भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साचून राहते. यामुळे डासांची पैदास होते. यामुळे मलेरियासारख्या रोगांचा प्रसार होण्यास वाव मिळत असल्याचे एका रहिवाशाने सांगितले. शहराच्या विविध भागांमधील देखाव्यांवर रानटी झुडपे उभी राहिली असून काहींचे रूपांतर तर चक्क कचराकुंडय़ांमध्ये झालेले दिसून येते. शहराच्या पाचपाखाडी, हरिनिवास, घोडबंदर रोड येथील ब्रह्मांड, मनोरुग्णालय परिसर, आनंदनगर, कोपरी यांसारख्या अनेक भागांमध्ये उभारण्यात आलेले हे बांधकाम पडीक अवस्थेत पाहायला मिळते.  पाचपाखाडी येथील लक्ष्मण नगर इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच देखावा उभारण्यात आल्यापासूनच पडीक अवस्थेत आहे. आता या देखाव्यात मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकण्यात येत असल्याचे इमारतीतील एका रहिवाशाने सांगितले. अशीच काही परिस्थिती ठाणे पूर्व येथील कनया नगर इमारतीसमोर बांधण्यात आलेल्या देखाव्याची पाहायला मिळते. येथे देखावा बांधण्यात आल्यानंतर मोजून चार दिवस कारंजे सुरू होते, अशी माहिती एका रहिवाशाने दिली. ठाणे मनोरुग्णालयासमोर बांधण्यात आलेल्या देख्याव्याची पूर्णत: पडझड झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील कारंजे बंद असून यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. घोडबंदर रोड परिसरात ब्रह्मांड परिसरात फेस -२ इमारतीच्या मागील बाजूस बांधण्यात आलेल्या देखाव्यात रानटी झाडे उगवली आहेत. तसेच तुटलेले कुंपण, यात पडलेल्या दारूच्या बाटल्या आणि कचरा यामुळे हा देखावाही केवळ नावापुरता उरला आहे. याचप्रमाणे हरिनिवास चौक आणि आनंदनगर येथील मो. दा. जोशी उद्यानातील देखावा यांचीही चांगलीच दुर्दशा झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा