महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस व रिपाइंच्या चार जणांनी अर्ज सादर केले. मनसेने अर्ज दाखल न करता राष्ट्रवादीला तर शिवसेनेने अर्ज दाखल न करता भाजपबरोबर जाण्याचे संकेत दिले आहेत.
महापालिका स्थायी सभापती पदाची निवडणूक २४ मार्चला होत आहे. त्यासाठी शुक्रवार हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. आदल्या दिवसापर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ताळमेळ बसत नसल्याचे कुरघोडीचे राजकारण सुरू होते. भाजपने साथ सोडल्यानंतर मनसेला राष्ट्रवादी, काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यावेळी स्थायी सभापतीपद राष्ट्रवादीला देण्याचे निश्चित झाल्याचा दावा करण्यात आला. त्या अनुषंगाने मित्र पक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. अखेरच्या मुदतीपर्यंत कोण अर्ज दाखल करणार याकडे सर्वाचे लक्ष होते. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतफे शिवाजी चुंबळे, काँग्रेसतर्फे राहुल दिवे, भाजपकडून कुणाल वाघ तर रिपाईच्यावतीने ललिता भालेराव यांनी अर्ज दाखल केला आहे. या पदासाठी अर्ज दाखल न करता मनसेने राष्ट्रवादीच्या मागे उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. अंतर्गत बेबनावात गुरफटलेल्या शिवसेनेने या निवडणुकीपासून अर्ज दाखल केला नाही. मित्रपक्ष भाजपच्या उमेदवाराने मात्र अर्ज भरला आहे. माघारीच्या मुदतीपर्यंत रिंगणात कोण राहणार आणि कोण गळणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. स्थायी सभापतीपदासाठी निव्वळ अर्ज दाखल करणे हा देखील दबाव तंत्राचा भाग असतो. या निवडणुकीच्या माध्यमातून आर्थिक उलाढालींना जोर आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनसे, राष्ट्रवादी, अपक्ष व काँग्रेस या पक्षांचे जवळपास दहा सदस्यांना पर्यटनासाठी पाठवून देण्यात आले आहे. ऐनवेळी कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून सर्वच राजकीय पक्ष सावध आहेत. चार वर्षांच्या कार्यकाळात सत्ताधारी मनसेला पहिल्या वर्षी या पदाला मुकावे लागले होते. पालिकेत सत्ता असुनही स्थायीचे सभापतीपद त्यांना मिळविता आले नाही. तेव्हाचा धडा घेऊन पुढील काळात असे घडणार नाही याची दक्षता मनसेकडून घेण्यात आली. भाजपने सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीने केलेल्या मदतीची उतराई त्यांनी अर्ज न दाखल केल्याचे अधोरेखीत होत आहे.

Story img Loader