कुही परिसरात १८ जानेवारीला रात्री घडलेल्या एका मुलीवरील अत्याचार व दरोडा प्रकरणातील चार नराधमांना सहा दिवसात अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या चार आरोपींना मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरजवळील नेपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तुकईथड रेल्वे स्थानकावर पकडण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिनेश राज लखन चव्हाण (रा. झिरी जि. हरदा मध्य प्रदेश), चच्चाय उर्फ चच्चु जोहरसिंग भोसले (रा. चांपा ता. कुही), गुलाबचंद उर्फ निन्निकी बागचंद भोसले (रा. झिरी जि. हरदा मध्य प्रदेश), आतीष उर्फ टेनटेन आरतीसिंग भोसले (रा. चांपा ता. कुही) ही अटक केलेल्या आरोपींची नावे असून रवि नावाचा आरोपी फरार आहे. घटना घडल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी अकरा पथके तयार करून आरोपींचा तपास सुरू केला. पोलिसांसमोर सात पैलू होते. घटना घडली तेव्हा जवळच्या एका फार्म हाऊसवर दारू पार्टी झाली होती. नागरिकांनी शंका व्यक्त केल्याने पोलिसांनी त्या पार्टीत सहभागी लोकांची विचारपूस केली. चार कुटुंबावर दरोडा पडला. त्यापैकी एका कुटुंबाने संशयिताचे नाव सांगितले होते. त्याची चौकशी केली. दोन कुटुंबात वैमनस्य असल्याने त्याचे नाव पुढे करण्यात आल्याचे उघड झाले. मात्र, याचाही सहभाग नव्हता.  दरोडेखोर मराठी व हिंदी भाषेत बोलत असले तरी मराठी धडपणे बोलत नव्हते. त्यांनी चेहरे झाकले असल्यामुळे वर्णनात अडचण आली. आरोपीचे हात खरबडीत असल्याचे पीडित मुलीने सांगितले होते. या उपलब्ध अत्यल्प माहितीच्या आधारे तपास सुरू होता. त्या परिसरात बहुसंख्येने परप्रांतीय मजूर राहतात. त्यांचीही चौकशी झाली. नागपुरातील एक कुख्यात आरोपी त्या परिसरात रहात असल्याचे समजल्याने त्या दिशेनेही चौकशी केली. त्यातूनही काहीच निष्पन्न झाले नाही. अखेर तेथून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावरील एका तांडय़ाला रात्री पोलिसांच्या पथकांनी घेरले. पोलिसाना पाहून तेथे पळापळ झाली. त्यात हाती सापडले त्यांची दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत कसून चौकशी केली. या प्रकरणी काहीच माहिती नसल्याचे सर्वचजण सांगत होते. चांपा गावाच्या नागरिकांनी पंचायत बोलावून तांडय़ावरील लोकांना घटनेचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. त्यानंतर दोन संशयित दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. या कसून केलेल्या चौकशीत एकाने आरोपींची नावे सांगून माहिती दिली. चच्चू व टेन टेन सख्खे चुलत भाऊ आहेत. फरार असलेला रवी व दिनेश हे जावई व मेहुणा आहेत. सर्व आरोपी विवाहित आहेत. पोलिसांनी घेरा केला तेव्हा नेमके हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या तांडय़ातील काही लोक, चांपा येथील नागरिकांनी गुन्ह्य़ाच्या शोधात सक्रिय मदत केली. आरोपींचा ठावठिकाणा समजल्यावर या नागरिकांसह पोलीस पथके मध्य प्रदेशात रवाना झाली. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरजवळील नेपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे सात किलोमीटर दुर्गम भागात आरोपींचा शोध घ्यावा लागला. खंडवा ते भुसावळ रेल्वे मार्गावरील तुकईथड या अगदी लहान रेल्वे स्थानकावर आरोपींना पकडण्यात यश आले.