राज्य शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा संमत केल्यानंतर त्याचे पालन करण्याची संधी नव्या वर्षांच्या प्रारंभीच मिळणार आहे. कारण २०१४ची सुरुवातच अमावास्येपासून होणार असून या दिवसाभोवती असणाऱ्या गैरसमजुतींना मूठमाती देण्याची ही एक चांगली संधी असल्याचे पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
डिसेंबर महिना आला की सर्वसाधारणपणे नव्या वर्षांत काय काय असेल, याची सर्वानाच उत्सुकता असते. २०१४ मध्येही अनेक वैशिष्टय़पूर्ण घटना घडणार आहेत. या वर्षांचा प्रारंभ बुधवारपासून तसेच समाप्तीही बुधवारीच होणार आहे. यापूर्वी २००३मध्ये असेच घडले होते आणि भविष्यात २०२०मध्येही असेच घडणार आहे. यापूर्वी १९९५ मध्ये १ जानेवारीला अमावास्या होती आणि २०३३चा प्रारंभही अमावास्येने होणार आहे. २०१४मध्ये एकूण चार ग्रहणे असून त्यापैकी दोन चंद्रग्रहणे, तर दोन सूर्यग्रहणे असणार आहेत. त्यापैकी ८ ऑक्टोबरचे चंद्रग्रहण पूर्व भारतातून नागपूर, नांदेड, परभणी, वर्धा, इंदौर येथून दिसेल.
ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे तीन महिने वगळून उर्वरित नऊ महिन्यांत लग्नाचे मुहूर्त आहेत. सरत्या वर्षांप्रमाणे नव्या वर्षांतही १८ फेब्रुवारी, १५ जुलै आणि ९ डिसेंबर रोजी अंगारकी चतुर्थी आहे. तसेच प्रजासत्ताक दिन, श्री महावीर जयंती आणि बकरी ईद हे तीनच सण रविवारी आले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना २१ सुट्टय़ा मिळणार आहेत. या वर्षी २४ सप्टेंबर रोजी भारताचे मंगळयान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. गौरी गणपती सात दिवस, तर धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत सलग पाच दिवस दिवाळी साजरी करता येणार आहे. पुढील वर्षी गणपती, नवरात्र आणि दिवाळी हे सण या वर्षीपेक्षा ११ दिवस आधी येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा