मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय मेडिकल आहे. या एवढय़ा मोठय़ा रुग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळवून देण्यासाठी चार ‘आरोग्यमित्र’ नेमण्यात आले असून ते कमी मानधनातच रुग्णांना सेवा देत आहेत. परंतु या आरोग्यमित्रांच्या समस्यांकडे कोणाचेही लक्ष नाही.  
‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ राज्य शासनाने गरीब रुग्णांवर खर्चिक शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने ही योजना अंमलात आणली. त्यानुसार २ जुलै २०१२ रोजी मेडिकलमध्ये या योजनेचे आरोग्य मदत केंद्र सुरू करण्यात येऊन चार ‘आरोग्यमित्र’ नेमण्यात आले त्यांच्याकडे रुग्णांची नोंद, त्यांची माहिती, उपचार होईपर्यंत रुग्णांजवळ थांबणे, रुग्णाला असलेला आजार त्या संबंधित असलेल्या डॉक्टरांकडे रुग्णांना नेणे, शस्त्रक्रियेची फाईल मंजुरीसाठी संबंधित डॉक्टरांकडे नेणे यासारखी कामे आरोग्यमित्रांकडे नेमून देण्यात आली आहे. एमडी इंडिया या कंपनीकडून महिन्याला ५ हजार ४०० रुपये एवढे मानधन या आरोग्यमित्रांना दिले जाते. मात्र, त्यांच्या कामाचा व्याप बघता हे मानधन खूपच अत्यल्प आहे. मेडिकलचा व्याप इतका मोठा आहे की, किमान २५ आरोग्यमित्र असणे आवश्यक आहे. मेडिकलमध्ये दररोज विविध आजारांचे रुग्ण येत असतात. त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया या जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत केली जाऊ शकते, पण आरोग्य मित्रांच्या कमतरतेमुळे रुग्णांपर्यंत पोहचणे आरोग्यमित्रांना कठीण जात आहे.     
आरोग्यमित्रांना मेडिकलमध्ये दररोज ८ ते १० किमी एवढे फिरावे लागते. त्या मानाने त्यांना दिले जाणारे मानधन खूपच कमी आहे. त्यांच्या मानधनात जर वाढ झाली तर अधिक जोमाने काम करून रुग्णसेवा देता येईल. केंद्र स्थापन झाल्यापासून कंपनीचे जिल्हा समन्वयक भगत यांनी एकदाही भेट दिली नसून आरोग्यमित्रांच्या समस्या जाणून घेतल्या जात नसल्याची खंत आरोग्यमित्रांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four health friend of medical are neglected
Show comments