साक्री तालुक्यातील चरणमाळच्या जंगलात बिबटय़ाने धुमाकूळ घातला असून गुरूवारी बिबटय़ाने केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांत शिक्षक दांपत्यासह दोन गुराखी असे एकूण चार जण जखमी झाले. काही जखमींवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नवापूरच्या साईनगरीत वास्तव्यास असलेले शिक्षक दांपत्य चरणमाळ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ध्वज वंदनासाठी दुचाकीवरून निघाले होते. सकाळी साडे सहाच्या सुमारास बोरझर-चरणमाळ घाटात त्यांच्यावर दोन बिबटय़ांनी हल्ला चढविला. त्यात वामन मधुकर गावित (३०) व सलविनावामन गावित (२७) हे जखमी झाले. त्यानंतर आसपासच्या ग्रामस्थांनी जखमी दांपत्याला नंदुरबारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती समजल्यावर माजीमंत्री सुरूपसिंग नाईक यांनी जखमींची विचारपूस केली. याच दिवशी अकरा वाजता बिबटय़ांनी चरणमाळच्या जंगलात गुराख्यांवरही हल्ला चढविला. जंगल शिवारात बैलांना चारण्यासाठी गेलेल्या देविदास लालजी गावित (२१) व रेशमा बुक्या गावित (३५)यांच्यावर बिबटय़ाने हल्ला चढविला.
उभयतांनी आरडाओरड केल्यामुळे बिबटय़ाने झुडपांमध्ये धूम ठोकली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपळनेर आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर धुळे जिल्हा रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. या घटनाक्रमामुळे तालुक्यात विशेषत: नवापूर, प्रतापपूर, बोरझर, चरणमाळ परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चरणमाळ जंगलात बिबटय़ासह हिंस्त्र पाण्यांचा वावर वाढला असून वन विभागाने त्वरित त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Story img Loader