जून व जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याने ११ पैकी चंदई, चारगाव, लभानसराड, दिना हे चार सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून इरई प्रकल्प तुडूंब भरल्याने धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. या जिल्ह्य़ातील ११ सिंचन प्रकल्पात ७५ टक्के पाणी साठा आहे.
यंदा जिल्ह्य़ात चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. साधारणत: ७ जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होते. यावर्षी तीन चार दिवस उशिराने पाऊस पडला तरी आता पावसाने चांगला वेग घेतला आहे. जूनच्या पहिल्या पंधरवडय़ात व शेवटय़ा आठवडय़ात चांगला पाऊस, तर जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामत: जिल्ह्य़ातील ११ पैकी ४ सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यात चंदई, चारगाव, लभानसराड हे तीन सिंचन प्रकल्प यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले होते, तर दिना प्रकल्प काल ओव्हरफ्लो झाला. इरई प्रकल्प तुडूंब भरल्याने धरणाचे तीन दरवाजे .२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे इरई नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणाचे पाणी नदीत सोडण्यात आल्याने नदी काठावरील गावात पाणी जाऊ नये म्हणून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्य़ाची पावसाची सरासरी १ हजार १४२.१४ मि.मी. असून सरासरी ५३८.५८ मि.मी. पाऊस झाला आहे. यातही सर्वाधिक पावसाची नोंद ब्रम्हपुरी तालुक्यात ६८६.५ मि.मी. घेण्यात आली. चंद्रपूर ५९२.८ मि.मी., बल्लारपूर ४९९.८, गोंडपिंपरी ४०८.६, पोंभूर्णा ३७१.९, मूल ४८३.६, सावली ४८१.७, वरोरा ६८६.१, भद्रावती ४६४.६, चिमूर ५५४, ब्रम्हपुरी ५८१.७, सिंदेवाही ५२४.४, नागभीड ६३९.९६, राजुरा ४६९.४२, कोरपना ६३४.५, जिवती ५६५.९ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्य़ातील धरणात ७५ टक्के पाणी साठा असून घोडाझरी प्रकल्प ७५ टक्के भरलेला आहे. आसोलामेंढा ३५ टक्के, नलेश्वर ३३ टक्के, अंमलनाला ५५.७६, पकडीगुड्डम ५२.२१७, डोंगरगाव ५९.१११ पाणी साठा आहे.