विनापरवाना सुरू असलेल्या शहरातील चार मिनरल वॉटर कंपन्यांना अन्न व औषध प्रशासनाने अलीकडेच टाळे ठोकले. अन्न व औषध प्रशासनाकडून सकाळपासूनच या कारवाईला सुरुवात करण्यात आली. पहिली कारवाई शहरातील तकिया वॉर्डातील ओअॅसिस फ्रेश वॉटर कंपनीवर करण्यात आली. या कंपनीकडे परवाना नव्हता. येथील पाण्याची तपासणी करण्यात येत नव्हती. याशिवाय, शिशीला लेबलही नव्हते. त्यामुळे या कंपनीला टाळे ठोकण्यात आले.
दुसरी कारवाई हेडगेवार चौकातील मयुरेश अॅक्वागार्ड कंपनीवर करण्यात आली. या कंपनीकडे पाणी परीक्षणाची यंत्रणा व परवाना नसल्यामुळे या कंपनीला सील करण्यात आले. तिसरी कारवाई तकिया वॉर्डातील गुजरात सोडा कंपनीवर करण्यात आली. या कंपनीतसुद्धा मोठय़ा प्रमाणात अनियमितता आढळून आली. चौथी कारवाई संताजी वॉर्डातील वैनगंगा अॅक्वागार्ड मिनरल वॉटर कंपनीवर करण्यात आली. या कंपनीकडे परवाना व लेबल नव्हते. त्यामुळे कंपनीला सील ठोकण्यात आले. या कंपन्यांकडे खरेदी-विक्रीची देयके नसल्यामुळे या कंपन्यांकडून किती व्यवसाय करण्यात आला, हेसुद्धा अस्पष्ट आहे.
या सर्व कंपन्यांमधील पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली  देशपांडे, उमप व अखिलेश राऊत यांनी केली. मागील अनेक वर्षांपासून या कंपन्यांच्या अनियमिततेबाबत लोकांना माहिती नसल्याने त्यांचा व्यवसाय राजरोसपणे सुरू होता. शहरातील या चारही कंपन्यांमधील पाणी, खानावळ, उपहारगृहात विकणे सुरू होते. उपहारगृहातील सीलबंद शिशीमधील पाणी चांगलेच असावे, असा समज असल्याने ग्राहकही पाणी विकत घेऊन पीत होते, परंतु या पाण्याचे र्निजतुकीकरण झाले की नाही, याची शहानिशा एकाही उपहारगृह मालकाकडून कधीही झाली नाही. कारण, या पाण्यावर नामांकित कंपनीच्या तुलनेत अधिक नफा मिळत असल्याने हे दुकानदारही कमी पैशात अधिक नफा कमावण्याच्या नादात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा