नांदगाव तालुक्यातील मांडवड शिवारात गुरुवारी रात्री दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकून साडेसहा लाख रुपयांची लूट केल्याने खळबळ उडाली आहे. या वेळी दरोडेखोरांच्या मारहाणीत कुटुंबातील चार सदस्य जखमी झाले. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडवड शिवारात गोविंद गरुड व कुटुंबीय वास्तव्यास आहे. गुरुवारी रात्री संपूर्ण गरुड कुटुंबीय गाढ झोपेत असताना पाच ते सहा दरोडेखोरांनी दगड मारून दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला. या आवाजाने सदस्य जागे झाले. दरोडेखोरांनी महिलांना दमदाटी करून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. तसेच कपाटातील रोख रक्कमही त्यांनी हस्तगत केली. या वेळी गोविंद गरुड, त्यांची मुले कैलास, ज्ञानेश्वर यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली. यशोदाबाई गरुड या महिलेसही दरोडेखोरांनी सोडले नाही. या घटनाक्रमामुळे इतर सदस्यही भयभीत झाले. सर्व माल घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. काही वेळानंतर कुटुंबीयांनी आसपास वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांसह पोलिसांशी संपर्क साधला. नांदगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मारहाणीत जखमी झालेल्या चौघांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यानच्या काळात प्रमुख मार्गावर नाकाबंदी करून दरोडेखोरांचा शोध घेण्यात आला. परंतु, कोणी हाती लागू शकले नाही. शुक्रवारी सकाळी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. दरोडय़ाच्या या घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader