गेल्या चार वर्षांंपासून दहशत माजवणारा स्वाईन फ्ल्यू हा जीवघेणा आजार पुन्हा परत आला असल्याचे दिसून येत आहे. अकोल्यातील एका चार वर्षांच्या बालिकेचा स्वाईन फ्ल्यूने नागपुरात मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे नागपुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे मेडिकल आणि मेयोला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कृपा प्रवीण तापडिया (वय ४ वर्षे) असे या बालिकेचे नाव असून ती अकोल्यातील तापडिया नगरातील रहिवासी आहे. सुरुवातीला किरकोळ ताप आल्याने तिला अकोल्यातील चाईल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला नागपुरातील सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील डॉ. आर.जी. चांडक यांच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये १७ फेब्रुवारीला दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. परंतु आजार बळावत जाऊन ९ मार्च रोजी ती दगावली.
तत्पूर्वी तिच्या रक्त आणि थुंकीचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल नागपूर येथील उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाला. त्यात तिला स्वाईन फ्ल्यू झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर अकोला येथे खळबळ उडाली असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी फवारणी करण्याचे व योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी नागपूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. वसंत झारे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.