अमिताभ-जया यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण
बॉलीवूडमधील नाती म्हणजे ‘अळवावरचे पाणी’ असे नेहमी म्हटले जाते, पण या बॉलीवूडमुळेच दोन व्यक्ती एकत्र आल्या, जन्माची गाठ बांधली आणि थोडीथोडकी नाही, तर तब्बल ४० वर्षे सुखात संसारही केला. बरोबर, आपण बोलत आहोत बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबद्दल! सोमवारी या दोघांच्या लग्नाला चाळीस वर्षे पूर्ण झाली आणि यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांनी १९७३ सालच्या ३ जूनच्या संध्याकाळची आठवण जागवली.
इतर कोणत्याही दिवशीच्या संध्याकाळसारखीच ती संध्याकाळही अगदी साधी होती. माझ्या आईवडिलांसह मी गाडीत बसून मलबार हिलवर एका मित्राच्या घरी गेलो. अत्यंत साध्या पद्धतीने, कोणताही बडेजाव न करता माझे आणि जयाचे लग्न झाले. आजही ती संध्याकाळ लख्ख आठवतेय, अशी आठवण अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिली आणि आपल्या हृदयातील एक कप्पा चाहत्यांसाठी खुला केला.
अमिताभ पुढे लिहितात की, ‘जंजीर’ यशस्वी झाला, तर आपण लग्न करायचे, असे वचन आम्ही दोघांनी एकमेकांना दिले होते. ‘जंजीर’ला स्वप्नवत यश मिळाले आणि आम्ही आयुष्यभरासाठी एकत्र बांधले गेलो. या गोष्टीला जास्त नाही, फक्त ४० वर्षे झाली आहेत. चाळीस वर्षांनंतर आता दोन मुले, तीन नातवंडे, जावई, सून आणि त्यांची कुटुंबे असा मोठा परिवार जोडला गेला आहे.
आपल्या लग्नाच्या चाळिसाव्या वाढदिवसाच्या दिवशी अमितजी कोणतीही कटू आठवण लिहिणे मात्र टाळतात. दोघांच्या आयुष्यात आलेले चढउतार, अमिताभजींची राजकीय कारकीर्द, त्या वेळी जया बच्चन यांनी त्यांना दिलेली साथ वगैरे गोष्टींचा पुसटसा उल्लेखही ते ब्लॉगवर करत नाहीत, पण शेवटी असे सुखी कुटुंब दिल्याबद्दल देवाचे आभार मानायलाही ते विसरत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा