परदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन संशयितांनी संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून एक लाख ३० हजार रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमेरिकेतील सी फूड कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष लॉयर पॅमेरा विल्यम आणि जोसेफ यांनी आपल्या बहिणीचा मुलगा मॉसेज नाडारला फोनद्वारे दाखविले. नोकरी व पासपोर्ट इमिग्रेशन शुल्कापोटी संशयितांनी वारंवार पैशांची मागणी केली. संबंधितांच्या सांगण्यावरून आपण सॅमन थेग, कॅनरा बँक खात्यावर १५ हजार आणि मोनिका कुकी कॅनरा बँक खात्यावर ४० हजार, जेम्स ओवेमी यांच्या खात्यावर ४५ हजार ५००, जॅगमॅग यांच्या खात्यावर ३० हजार असे एकूण एक लाख ३० हजार रुपये जमा केले. पैसे भरल्यानंतर ई-मेलद्वारे बनावट पावती, नेमणुकीचे पत्र आणि आरोग्य विम्याची बनावट कागदपत्रे पाठविण्यात आली. यूएसए राजदूत कार्यालयाच्या नावाने काही बनावट कागदपत्रे होती. या प्रक्रियेचा सखोल तपास केल्यावर यात मॉसेजची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. संशयितांनी इलेक्ट्रॉनिक ओळख दर्शकाचा वापर करून संदेश वहनाद्वारे तोतयेगिरी करून फसवणूक करण्यात आली. परदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून गंडविण्याचे प्रकार अधूनमधून घडत असतात. बनावट नेमणूक पत्र देऊन पैसे उकळण्याची व्हाईट कॉलर गुन्हेगारी वाढत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सुशिक्षित वर्ग सहजपणे त्यांच्या जाळ्यात सापडतो. परदेशात नोकरी करण्याची आस असल्याचे हेरून अशा सुशिक्षितांना जाळ्यात ओढण्याचे पद्धतशीर प्रयत्न संशयितांकडून होत असतात. हा प्रकारही त्याला अपवाद ठरला नाही.