शेतकऱ्यांना अश्वगंधा आणि कोरफड या वनौषधींची लागवड केल्यास भरपूर उत्पादन होऊन लाखो रुपये कमावता येतील, असे सांगून लागवडीसाठी जे बी लागते त्याची दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून लाखो रुपये गोळा करून पसार होणाऱ्या न्यू लाईफ केअर मल्टिसíव्हसेस प्रा.लिमिटेड कंपनीविरुध्द काही शेतकरी व कंपनीच्या कृषी सहायकांनी भंडारा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, आपले पितळ उघड झाल्याने गोंदिया येथील बालाघाट मार्गावरील  वनविभागाच्या वन्यजीव कार्यालयासमोरील कार्यालयालाही ताळे ठोकण्यात आले आहेत. न्यु लाईफ केयर मल्टिसíव्हसेस प्रा.लिमिटेड ही नागपुरातील कंपनी असून त्याच्या शाखा भंडारा व गोंदिया येथे उघडण्यात आल्या होत्या. शेतीत वनौषधीची लागवड करून त्यावर आकर्षक कमिशन आणि ठोस उत्पादनाची हमी या कंपनीचे संचालक भीमराव मेश्राम यांनी दिली होती. ३० नोव्हेंबर २०१२ ला शाखा उघडण्याकरिता जाहिरात देऊन बेरोजगारांना आकर्षक कमिशनचे आमिष देऊन काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. अश्वगंधा व कोरफडीसारख्या वनस्पतींची लागवड केल्यास शासनाकडून अनुदान देण्याची ग्वाही दिली. फेंचाईसी देण्यात आली. जिल्हा पातळीसाठी वेगळे कमिशन, तर तालुक्यासाठी वेगळे कमिशन ठेवण्यात आले.
तरुणांनी ही सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. काही शेतकऱ्यांनी या वनस्पतींची लागवड केली. ४०० ग्रॅमसाठी ६० हजार रुपये होतात. याची दहा टक्के रक्कम या कंपनीच्या संचालकांनी घेतली. परंतु, या वनौषधीला कुठलेही सरकारी अनुदान नसल्याची बाब जेव्हा शेतकरी आणि कामावर असलेल्या तरुणांना समजली तेव्हा भंडाऱ्यातील त्यांचे कार्यालय गाठून पशाची मागणी केली तेव्हा संचालक मेश्राम भंडारा आणि गोंदियातील कार्यालये बंद करून पसार झाला. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या चकरा संबंधित कार्यालयाकडे वाढविल्या आहेत. कंपनीचा फलकही काढण्यात आला असून साधा कागद तेथे लावण्यात आला आहे. त्यावरील मोबाईल क्रमांकही बंद करण्यात आला. त्यामुळे या कंपनीने लाखोंची माया जमवून पळ काढल्याचा असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे.