मर्चन्ट नेव्हीमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या दलालांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून नवी मुंबईतील तीन तरुणांना दुबई येथे नोकरी लावतो सांगून जहाजावर पाठविण्यात आले आहे, पण या तरुणांना नऊ महिन्यांचा वनवास भोगावा लागला आहे. दुबईहून निघालेले हे जहाज इराणमध्ये अडविण्यात आले आहे. या जहाजावर तीन भारतीय तरुण अत्यंत हालअपेष्टांचे जीवन जगत असून त्यांना तेथे मारहाण करण्यात येत आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यात या तरुणांना दुबईला पाठविणाऱ्या दलालाच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.
करणसिंग राणा, राजेशकुमार स्वामी आणि विक्रांतसिंह कौशल ह्य़ा तीन भारतीय तरुणांना एपीएमसी सेक्टर १९ मधील बॉम्बे ऑफशोअर अन्ड शिपिंग सव्र्हिसेस कंपनीच्या वतीने गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात दुबई येथे जहाजावर पाठविण्यात आले. त्यासाठी त्यांना ३०० डॉलर पगार दिला जाईल, असे सांगण्यात आले होते, पण दुबईला गेल्यानंतर या तीन तरुणांची मोठी निराशा झाली. मोठय़ा जहाजाऐवजी छोटय़ा जहाजावर काम करावे लागले तर पगाराचा पत्ता राहिला नाही. दुबईवरून हे तीन तरुणांचे जहाज इराणला गेले. इराण सरकारच्या काही नियमांची पूर्तता या जहाजाने पूर्ण न केल्याने हे जहाज इराणच्या अबास बंदरात केवळ उभे करण्यात आले आहे. या जहाजावरील सर्व कामगारांचे अतोनात हाल सुरू असून तीन भारतीय या छळवणुकीमध्ये अडकले आहेत. त्यांना जहाजावरील छोटीमोठी कामे दिली जात असून अन्नधान्य घेण्यास पैसे देण्यात येत नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत असून या तरुणांना जहाज मालकांच्या गुंडांनी मारहाण केली. त्यात हे तरुण रक्तबंबाळ झाले असल्याचे व्हिडीओ उपलब्ध झाले आहेत. गेले नऊ महिने हे तरुण हलाखीचे जीवन जगत असून त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचे पालक दारोदारी भटकत आहेत. मात्र त्यांना दाद मिळत नाही. एपीएमसी पोलीस ठाण्यात बॉम्बे ऑपशोअरचे भागीदार सुनील कुमार मौन आणि इतर भागीदारांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. तरुणांना माघारी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारे तरुणांना जाळ्यात ओढून फसवण्याचे प्रमाण नवी मुंबईत वाढले असून पोलीस कडक उपाययोजना करीत नसल्याने दलालांचे हे उद्योग राजरोस सुरू आहेत.

Story img Loader