आर.एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय आणि संस्थेच्या अध्यक्षांनी केलेल्या प्राध्यापकाच्या विरोधातील कटकारस्थान आणि बनावट कागदपत्र प्रकरणाचा पोलिसांनी तपास करावा, असा आदेश मुख्य न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
एका ज्येष्ठ महिला प्राध्यापकाच्या विरोधात दृष्टीहीन, कनिष्ठ महिला प्राध्यापकाने तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये तक्रार करून पेनाने सही करणे हे प्रकरण संशयास्पद असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य संध्या नायर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अखिलेश पेशवे, धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्राम जामदार यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यासारखे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या नायर यांनी त्याच महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक तनुजा नाफडे यांच्या विरोधात बळाचा वापर करून त्यांना विभाग प्रमुख पदावरून अवनत केले. त्यासाठी कोणत्याही नैसर्गिक न्यायालयाचा अवलंब करण्यात आला नाही. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि संस्थेच्या विरोधात नाफडे विद्यापीठ आणि महाविद्यालय न्यायाधिकरणाकडे(कॉलेज ट्रिब्युन) गेल्या. त्याठिकाणी संध्या नायर आणि विश्राम जामदार यांना तनुजा नाफडे यांच्या विरोधातील कपट कारस्थाने बंद करण्याची ताकीद देण्यात आली. त्यानुसार नाफडे यांच्या विरोधातील अनेक खोडसाळ प्रकार बंद करून त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे पद प्रदान करण्यात आले. प्राचार्यानी दोन प्राध्यापकांना हाताशी धरून कटकारस्थान रचले व नाफडे यांच्या विरोधात बनावट तक्रारी केल्या. आश्चर्य म्हणजे ज्या प्राध्यापकांना हाताशी धरून तक्रारी करण्यात आल्या त्यापैकी एक कनिष्ठ महिला प्राध्यापक दृष्टीहीन असून तिने तीन वेगवेगळ्या भाषेत तक्रार लिहून त्यावर पेनाने सही केल्याची दिसून आले. गुन्हेगारी पद्धतीने कट करून बनावट कागदपत्रे सादर करण्यासारखे गंभीर ताशेरे न्यायालयाने ओढले असून या संपूर्ण प्रकरणाची पोलीस तपासणी करण्याचे आदेश अंबाझरी पोलीस ठाण्याला दिले आहेत. तनुजा नाफडे यांच्या वतीने ए.पी. रघुते यांनी न्यायालयात बाजू मांडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा