चेन्नई येथील हेवनली इंटरडिनॉमिनल मिशन ट्रस्टच्या नावाने गुंतवणूक योजना जाहीर करून कष्टकरी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार मंगळवारी पोलिसांकडे देण्यात आली. तक्रार दाखल करण्यासाठी दिवसभर ४०हून अधिक महिला पोलीस ठाण्यात ठाण मांडून होत्या. या प्रकरणी चौकशीअंती कारवाईचे आश्वासन पोलीस अधिका-यांनी दिले आहे.
हेवनली इंटरडिनॉमिनल मिशन ट्रस्ट या नावाने चेन्नई येथील संस्था तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांत कार्यरत होती. संस्थापक डॉ. मेळगी जॉन प्रभाकरन हे असून त्यांच्या पत्नी ट्रस्टच्या खजिनदार आहेत.  
या ट्रस्टने ख्रिश्चन समाजातील गरीब व कष्टकरी महिलांना मदत स्वरूपात निवृत्तिवेतन देण्याची योजना जाहीर केली. एका व्यक्तीकडून १०५० पासून १०५०० रुपयांपर्यंत गुंतवणूक करून सभासद होण्याचे आवाहन केले. या बदल्यात संस्था त्यांना पुढील ११ महिन्यांत ११ हप्त्यांद्वारे ६ हजारांपासून ६० हजारांपर्यंत परतावा देईल असे सांगितले. या संस्थेने जुलै २०१०पासून मिरज, सांगली, तासगाव, माधवनगर परिसरात आíथक व्यवहार केले आहेत. स्थानिक पातळीवर पी. वाय. जोब व पौलस कुरणे यांनी ही योजना राबविली. अशोक सौंदडे, शमुवेल सौंदडे व पास्टर वाघमारे यांनी मिरजेतील काही महिलांना या योजनेंतर्गत जुलै २०१० ते ऑक्टोबर २०११पर्यंत योजनेत समाविष्ट होण्यास प्रवृत्त करून लाखो रुपये गोळा केले आहेत.
या संदर्भात अन्यायग्रस्त महिलांनी मंगळवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.  मात्र बहुसंख्य महिलांकडे रकमा भरल्याच्या पावत्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे चौकशी करून कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी फसवणूक झालेल्या महिलांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार दिली आहे.