लग्नाचे आमिष दाखवून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून आणि नंतर त्यांची फसवणूक करून पळ काढणारे लखोबा लोखंडे हे पात्र चांगलेच गाजले होते. मुंबईत असाच एक लखोबा लोखंडे अवतरला असून शिवाजी पार्क पोलिसांनी त्याला बेडय़ा ठोकल्या आहेत.
ठाण्यात राहणाऱ्या नेहा जोशी (२५) (नाव बदललेले) या तरुणीने दैनिकात आपल्या लग्नासाठी जाहिरात दिली होती. त्यात नेहाचा मोबाईल क्रमांक आणि पत्ताही होता. त्यावर मनोज वाणी नावाच्या एका तरुणाने संपर्क केला. एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगत त्याने जोशी कुटुंबियांना भुरळ घातली. या नंतर ठाण्यात जाऊन जोशी कुटुंबियांचा तो पाहुणचारही घेऊन आला. लवकरच आपण परदेशी जाणार आहोत, असे त्याने सांगितल्यावर जोशींनी हे स्थळ नक्की केले. मग दागिने बनविण्यासाठी त्याने नेहाला दादरला बोलावले. तुझ्या गळ्यात असलेली सोनसाखळीसारखीच सोनसाखळी बनवायची आहे, असे सांगत ती आपल्याकडे घेतली. नेहानेही लग्न ठरलेलेच असल्याने विश्वासाने ती सोनसाखळी दिली. त्यानंतर मग मनोज वाणीने पळ काढला. बराच वेळ वाट पाहिल्यावर तिला संशय आला. त्याचा फोनही बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे कळताच तिने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, याच दरम्यान विक्रोळी येथील स्वप्ना मेहेंदळे (नाव बदललेले) नावाच्या तरुणीला अशाच पद्धतीने गंडा घातला गेला होता. या दोन्ही प्रकरणांतील कार्यपद्धती समान असल्याने हा आरोपी एकच असल्याची पोलिसांची खात्री होती. दरम्यान, २०१२ मध्ये मुलुंड येथे अशाच एका लखोबा लोखंडेला अटक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा फोटो या दोन्ही तरुणींना दाखवला असता त्यांनी हा तोच आरोपी असल्याचे ओळखले. या ठगाचे नाव होते प्रशांत मांजरे.
जामिनवार सुटून त्याने पुन्हा आपला ‘धंदा’ सुरू केला होता. शिवाजी पार्क पोलिसांकडे या मांजरेचा केवळ फोटो होता. त्यावरून तो दादरच्याच एका लॉजमध्ये लपला असल्याचा छडा पोलीस उपनिरीक्षक बने यांनी लावला आणि लगेच त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. यासंदर्भात पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, मांजरे हा बोलण्यात पटाईत होता. त्याचे वय ५० असले तरी तो मुलींना ३५-४० असे वय सांगायचा. मोठय़ा हुद्दय़ावरील अधिकारी, मोठा पगार असे सांगत असल्याने मुली आणि त्यांचे कुटुंबीय त्याच्यावर भाळत असत. आतापर्यंत त्याने तीन मुलींना गंडविल्याचे उघड झाले असले तरी प्रत्यक्षात अनेक मुलींना त्याने फसविले असल्याची शक्यता कुलकर्णी यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे मांजरे हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. तो पुण्याला राहणारा आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परशुराम काकड या लखोबा लोखंडेचा अधिक तपास करत आहेत.