कल्याण-डोंबिवली शहरातील वाढता बकालपणा आणि वाहतूक कोंडीमुळे ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांना विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देण्याचा ठराव पालिकेच्या महासभेत संमत करण्यात आला आहे. मनसेच्या लोकप्रतिनिधींनी हा प्रस्ताव मांडला.
या निर्णयानुसार आता कल्याण-डोंबिवलीत परिवहन विभागाच्या वतीने दोन स्वतंत्र बस फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. या बस सकाळी आणि संध्याकाळी विशिष्ट वेळेत ज्येष्ठ नागरिकांना कल्याण तसेच डोंबिवली शहराच्या विविध भागांतून फेरफटका मारून आणणार आहेत. कल्याणमधून काही बस टिटवाळा, खिडकाळी येथे सोडण्यात येतील. या बसमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना तिकीट काढण्याची गरज भासणार नाही.
 विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी स्वत:च्या निधीतून १७ लाखांचा निधी बस खरेदी करण्यासाठी देण्याची तयारी दाखवून हा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रस्तावाचे शिवसेना, भाजप, काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी प्रथम स्वागत करून नंतर त्यावर टीकेची झोड उठवली. केवळ राजकीय गणिते करून मनसेने हा प्रस्ताव आणला आहे, अशी टीका करून एका नगरसेवकाच्या प्रभागात प्रशासन अशी मोफत बससेवा सुरू करण्यास मंजुरी देत असेल तर ११२ नगरसेवकांच्या प्रभागात अशी सेवा सुरू करा व तेथील ज्येष्ठ नागरिकांना सुविधा द्या, अशी मागणी करून सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगरसेवक हळबे यांच्या प्रस्तावात कोलदांडा घालण्याचा प्रयत्न केला.
आपण ही बस स्वनिधीतून खरेदी करणार आहोत. ही बस पालिका हद्दीत कोठेही चालवावी. प्रशासन याबाबतीत अंतिम निर्णय घेणार आहे, असे सांगत हळबे यांनी टीका करणाऱ्यांना निरूत्तर केले. अखेर हा प्रस्ताव फेटाळला तर निवडणुकीत ज्येष्ठ नागरिक त्याचे उट्टे काढतील या भीतीने सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या उपसूचनांची दखल घेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना शहराच्या विविध ठिकाणी प्रवास करता येणार आहे. गेल्या वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांनी अशी सुविधा देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे, असे हळबे यांनी सांगितले. पालिका हद्दीतील १५ ते २० ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. त्यांची सभासद संख्या तीस ते चाळीस हजार आहे.