व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय देणारी भारतीय संदेशवहन अ‍ॅप कंपनी ‘हाइक’ने आता मोफत फोन कॉल सुविधाही सुरू केली आहे. ही सुविधा सुरुवातीला केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी सुरू होणार असून मार्च २०१५पर्यंत आयओएस आणि विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
हाइकने २०१२मध्ये जागतिक बाजारपेठेत उडी घेतली आणि त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या अल्पावधीत कोटय़वधी झाली. संदेशवहन अ‍ॅपमधील सुविधांमुळे काही काळाने व्हॉट्सअ‍ॅपलाही आपल्या सुविधांमध्ये बदल करावा लागला होता. या कंपनीने नुकतीच ‘झिप फोन’ ही मोफत कॉलिंग अ‍ॅप कंपनी विकत घेतली.
या कंपनीने विकसित केलेल्या सुविधांमध्ये काही बदल करून हाइकने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आता मोफत कॉलिंग अ‍ॅपमध्येही मोठी स्पर्धा होणार असून व्हॉट्सअ‍ॅपही लवकरच या स्पध्रेत उतरणार असल्याची चर्चा आहे.

हाइक फ्री कॉलिंगची वैशिष्टय़े
* हाइक टू हाइक २जी, ३जी आणि वाय-फाय     जोडणीने मोफत कॉल.
* सुविधा २०० देशांमध्ये उपलब्ध
* इंटरनेटचा कमीतकमी  वापर होणार. म्हणजे एका एमबीमध्ये जास्तीतजास्त कॉल मिनिट मिळणार.

ही सुविधा कशी वापरणार?
* ही सुविधा वापरण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडील हाइकचे अ‍ॅप अद्ययावत करून घ्या.
* यानंतर तुमच्या फोनमध्ये कॉलिंग सुविधेचा पर्याय दिसेल.
* यामध्ये तुमच्या संपर्क विभागातील यादीत हाइक वापरणाऱ्यांची नावे त्यामध्ये येतात. त्यातून  तुम्ही हाइक कॉल करू शकता.

कॉलिंगची ही मोफत सुविधा सुरू करताना आम्ही प्रामुख्याने दोन गोष्टी लक्षात घेतल्या, त्या म्हणजे भारतात कमी पैशांत जास्त सुविधा कशी देता येईल आणि एकाच वेळी ही सेवा विविध देशांमध्ये कशी सुरू करता येईल. यामुळे आम्ही तयार कलेल्या सुविधेमध्ये एका एमबीमध्ये जास्तीतजास्त मिनिटे बोलण्याची सुविधा तुम्हाला मिळणार आहे. तसेच ही सेवा एकाच दिवशी २०० हून अधिक देशांमधील वापरकर्त्यांना जोडणारी आहे.
    -केविन भारती मित्तल,
    संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, हाइक मेसेंजर.

Story img Loader