खड्डेमुक्त शहर, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल व गर्दीच्या ठिकाणी वाहनतळ, महिलांसाठी शहरात ठिकठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहे, शहरात सांस्कृतिक भवन व नाटय़गृह, ज्येष्ठांसाठी विरंगुळा मैदाने, उपनगरातून ड्रेनेज, भाजीमंडई, प्रसूतिगृह, सार्वजनिक आरोग्यकेंद्रे व स्मशानभूमी, शहराला स्वच्छ व मुबलक पाणी आदी आश्वासने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. ‘आघाडीचा संकल्प’ या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन आज राष्ट्रवादी भवनमध्ये करण्यात आले. सहापानी संयुक्त जाहीरनाम्याचे प्रकाशन काँग्रेसचे प्रभारी आ. शरद रणपिसे, आ. अरुण जगताप, आ. डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार दादा कळमकर, माजी महापौर व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, प्रदेश काँग्रेस संनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख, जिल्हा सरचिटणीस अनंत देसाई आदींच्या उपस्थित करण्यात आले.
शहराचे विद्यमान आमदार अपयशी ठरले असून, त्यांनी गेल्या २५ वर्षांतील कामांचे तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या मनपा सत्तेच्या माध्यमातून केलेल्या कामांचा हिशेब द्यावा अशी मागणी करतानाच जाहीरनाम्यात माजी नगराध्यक्ष जगताप, माजी महापौर संदीप कोतकर व संग्राम जगताप यांच्या कारकीर्दीत केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली आहे. गंगाउद्यान, शहर बस सेवा, नगरोत्थान अंतर्गत पथदिवे, फेज-२ पाणी योजना, नगरोत्थानअंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व सुशोभीकरण ही आघाडीची मनपामध्ये सत्तेत असताना केलेली उल्लेखनीय कामे असल्याचे छायाचित्रांसह नमूद करण्यात आले आहे. जाहीरनाम्यात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व शरद पवार यांच्यापासून तर थेट शहर जिल्हाध्यक्ष अशा विविध पदांवरील एकूण ३० नेत्यांची छायाचित्रेही आहेत.
‘आघाडीचा संकल्प’ या शीर्षकाखाली मनपामध्ये सत्ता मिळाल्यास विविध विकासकामे करण्याची आश्वासने देण्यात आली आहेत. औद्योगिक विकासासाठी एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी प्रयत्न, रोजगारांसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षण योजना, आयटी पार्क सुरू करण्यासाठी प्रयत्न, शहरातील विविध ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास, असंघटित मजुरांसाठी घरकुल योजना, अद्ययावत उद्यानांची निर्मिती, केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने झोपडपट्टी पुनर्वसन योजना, प्रशासकीय कामांसाठी ई-गव्हर्नन्स सुविधा निर्माण करणे, घनकच-यांची योग्य विल्हेवाट लावून स्वच्छ व सुंदर शहर करणे आदी आश्वासनांचा त्यात समावेश आहे.
खड्डेमुक्त शहर, उड्डाणपूल, नाटय़गृह आणि बरेच काही…
खड्डेमुक्त शहर, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल व गर्दीच्या ठिकाणी वाहनतळ, महिलांसाठी शहरात ठिकठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहे, शहरात सांस्कृतिक भवन व नाटय़गृह, ज्येष्ठांसाठी विरंगुळा मैदाने, उपनगरातून ड्रेनेज, भाजीमंडई, प्रसूतिगृह, सार्वजनिक आरोग्यकेंद्रे व स्मशानभूमी, शहराला स्वच्छ व मुबलक पाणी आदी आश्वासने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.
First published on: 10-12-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free city of the ditch flyovers theatre and more