पुराणकालीन तलवारी, चिलखते, भाला, प्राचीन नाणी व शिलालेख, गंजिफा, ईस्ट इंडिया कंपनीने तयार केलेला १८५९चा भारताचा नकाशा.. अशा नानाविध दुर्मीळ वस्तूंचा खजिना सार्वजनिक वाचनालयाने खास उन्हाळी सुटीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खुला केला आहे. सावानाचे दुर्मीळ वस्तुसंग्रहालय २ मे ते १५ जून या कालावधीत दुपारी चार ते सायंकाळी साडेसात या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
१६४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या या वाचनालयाच्या दालनात वस्तुसंग्रहालय नव्या स्वरूपात सादर झाले आहे. विद्यार्थ्यांना सुटीचा आनंद लुटता यावा म्हणून हे दुर्मीळ वस्तुसंग्रहालय विनामूल्य उघडे राहणार आहे. या संग्रहालयात वेगवेगळी दालने आहेत. लेखन कलेचा उगम व विकास हे त्यापैकीच एक. लेखन कलेच्या उगमातील विविध टप्पे या ठिकाणी पाहाता येतात.
ताम्रपट, लेखणीचे प्रकार, छपाईतील साहित्य आदी वस्तूंनी हे दालन सजले आहे. सावानाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारे दालनही संग्रहालयाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. याशिवाय सुमारे २०० वर्षांपूर्वीची दुर्मीळ अशी जवळपास ३० काचचित्रे, पाषाण व काष्ठशिल्प यांचेही स्वतंत्र दालन आहे. या ठिकाणी अकराव्या शतकातील सूरसुंदरीची पाषाणातील प्राचीन मूर्ती आहे.
शस्त्रागार दालनात अतिशय दुर्मीळ शस्त्रास्त्रे पाहावयास मिळतात. त्यात गुर्जे या प्राचीन शस्त्रासह चिलखत, जांबिया, जमधर, किरज तलवार, समुराई तलवार, पट्टापान, चंद्रभाल, अंकुश कटय़ार आदींचा समावेश आहे.
धातू देवमूर्ती, धातूच्या इतर वस्तू, पुरातत्त्व व अभिलेखाकार, अभिलेखाकार तसेच यज्ञ संकल्पना, चित्रकला, ऐतिहासिक स्थळे, नाणे व तिकीट विभाग, नाशिकची साहित्य परंपरा अशी दालने येथे आहेत. नाणे विभागात मोगल, मराठा कालखंडातील तर काही नाणी गुप्त कालखंडातील आहेत. सातकर्णी, शिवछत्रपती यांची दुर्मीळ नाणी तसेच दुर्मीळ तिकिटे व तिकिटाचे प्रथम दिवस आवरण याचाही संग्रह आहे. चित्रकला विभागात दुर्मीळ अशी दख्खन मराठा शैलीतील रागमालेतील जवळजवळ ५० चित्रे आहेत. हा सर्व खजिना शालेय विद्यार्थ्यांना अनुभविण्याची संधी सावानाने उपलब्ध करून
दिली आहे.

Story img Loader