पोलीस दलाच्या भरतीच्या वेळी चार तरुणांच्या झालेल्या मृत्यूची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारपासून मुंबईत महिला पोलिसांची भरती प्रकिया सुरू होत आहे. यात भाग घेणाऱ्या तरुणींसाठी मोफत निवास, भोजनाची तसेच इतर सुविधांची व्यवस्था ताराबाई बडगुजर या स्वयंसेवी संस्थेने नि:शुल्क केली आहे.
विक्रोळीत पुरुष पोलीस पदाच्या भरतीच्या वेळी चार पोलिसांचा धावतांना मृत्यू झाला होता. प्राथमिक सोयीसुविधांच्या अभावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यांना सरकारकडून कोणत्याही सोयीसुविधा मिळाल्या नव्हत्या. या तरुणांना उघडय़ावर झोपावे लागले होते. पिण्याचे पाणी अशुद्ध होते तसेच परिसरात खाण्यापिण्याची सोय नसल्याने सगळ्यांचेच हाल झाले होते. पुरूष पोलीस भरती पाठोपाठ मंगळवारपासून सांताक्रुझच्या कलिना येथे महिला पोलिसांची भरती सुरू आहे. सरकारवर अवलंबून न राहता त्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी ताराबाई बडगुजर संस्थेने पुढाकार घेतला आहे.
भरतीसाठी येणाऱ्या महिला आणि त्यांच्या पालकांसाठी वाकोल्यातील कदम सभागृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना दोन वेळचे जेवण, चहा व नाश्ता देण्यात येणार आहे. तसेच कागदपत्रांच्या प्रती काढण्यासाठी हॉलमध्येच झेरॉक्स यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांना भरतीच्या ठिकाणी नेण्यासाठीही वाहनाची सोय करून देण्यात आली आहे. या सर्व सुविधा विनामूल्य असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अजय बडगुजर यांनी दिली.