करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या, देणगीदारांची साथ, जागेची उपलब्धता आदी घटक लक्षात घेऊन १५ एप्रिलपासून महालक्ष्मी मोफत अन्नदानाचा उपक्रम दररोज राबविला जाणार आहे.    
या उपक्रमाचे उद्घाटन तिरूपती देवस्थानचे कार्यकारी संचालक एल.व्ही.सुब्रह्मण्यम (आय.ए.एस.)यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुण्या म्हणून महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी असून अध्यक्षस्थान महापौर जयश्री सोनवणे या भूषविणार आहेत. या वेळी नगरसेवक प्रा.जयंत पाटील, आर.डी.पाटील, पद्मजातिवले यांच्यासह राजू जाधव व महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष श्रीरंग केशव कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.    
श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, कोल्हापूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी व सहकाऱ्यांनी गेली ५ वर्षे मोफत अन्नदानाचा उपक्रम चालविला आहे. या उपक्रमास महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. सुरुवातीस केवळ दर पौर्णिमेस हे अन्नछत्र चालविले जात होते. त्यास मिळत असेलला प्रतिसाद व भाविकांची गरज लक्षात घेऊन हे अन्नछत्र दर पौर्णिमेबरोबरच दर शुक्रवारी देण्याचे सुरू केले. श्री महालक्ष्मी भक्त मंडळ-धर्मशाळा यांच्या हॉलमध्ये हा उपक्रम यशस्वी केला गेला. नंतरच्या काळात पौर्णिमा, शुक्रवारबरोबरच मंगळवारीही हे अन्नछत्र सुरू ठेवले गेले. आता दररोज या अन्नछत्राचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

Story img Loader