दक्षिण मुंबईला थेट पूर्व उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेला १७ किलोमीटर लांबीचा पूर्व मुक्त मार्ग अंतिम टप्प्यात आला आहे. वर्षांच्या सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणे मे महिन्यात ऑरेंज गेट ते पांजरापोळपर्यंतचा साडेचौदा किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याठी ‘एमएमआरडीए’त या टप्प्यातील कामावर अखेरचा हात फिरवण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनाची ‘उलटी गिनती’ही सुरू झाली आहे.
मुंबईतील रस्ते वाहतुकीतील एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पूर्व मुक्त मार्ग प्रकल्प हाती घेतला. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाजवळील ऑरेंज गेट ते आणिक हा पहिला टप्पा, आणिक ते पांजरापोळ हा दुसरा टप्पा आणि पांजरापोळ ते घाटकोपर हा अडीच किलोमीटर लांबीचा शेवटचा तिसरा टप्पा अशारितीने या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे मुंबईतून आणिकपर्यंत उन्नत मार्गाने (इलेव्हेटेड रोड) व नंतर आणिक ते पांजरापोळ दरम्यान भाभा अणुसंशोधन केंद्राच्या डोंगरात बांधण्यात आलेल्या ५०० मीटर लांबीच्या भुयारी रस्त्याने वाहनचालकांना प्रवास करता येईल. त्यामुळे मुंबईहून नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या वाहनांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचेल.
या प्रकल्पातील ऑरेंज गेट ते आणिक हा पहिला टप्पा, आणिक ते पांजरापोळ हा दुसरा टप्पा असा एकूण १४.५ किलोमीटरचा रस्ता मे महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्यात येईल असे ‘एमएमआरडीए’ने जाहीर केले होते. पांजरापोळ ते घाटकोपर या २.५ किलोमीटर लांबीच्या अंतिम टप्प्याचे काम व्हायला थोडा वेळ लागेल. त्यानुसार पहिल्या १४.५ किलोमीटरच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या टप्प्यातील उन्नत मार्ग आणि रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम वेगात सुरू असून अखेरचा हात फिरवण्याच्या कामांना वेग आला आहे. या रस्त्यावर वेगमर्यादा किती असावी याबाबतही विचारविनिमय सुरू झाला असून ती ५० ते ६० किलोमीटर ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहे.
हा प्रकल्प मे महिन्यात सुरू होण्याचे आता जवळपास निश्चित झाले असले तरी त्यातही एक अडचण राहिली आहे. आणिक येथे या रस्त्यावर जाण्या-येण्यासाठी बांधण्यात येणारा जोडरस्ता अद्याप तयार झालेला नाही. तो तयार होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे थेट पांजरापोळला जाऊनच वाहनधारकांना या जलदगती रस्त्याचा वापर करता येईल.

Story img Loader