ठाण्यातील सावरकर प्रेमींच्या कल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन यंदा ६ जुलै रोजी बँकॉक (थायलंड) येथे होणार असून या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. स्वागताध्यक्ष दीपक दळवी यांनी स्वा. सावरकर विश्व संमेलनाविषयी विस्तृत विवेचन केले. यापूर्वी मॉरिशस, दुबई आणि लंडन येथे हे संमेलन पार पडली असून त्याचा आढावा या वेळी घेण्यात आला.
सावरकरांच्या विचारांना देशाच्या मर्यादा असूच शकत नाही. त्यांनी केलेले कार्य हे जगभरातील लोकांना ज्ञात होण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या संमेलनांना मिळालेल्या प्रतिसादावरून सावरकरांच्या विचारांची लोकप्रियता लक्षात येते. तसेच त्यांचे विश्वरूपी प्रतिभेस बंदिस्त न ठेवता जगभर त्याचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे असल्याचे डॉ. शेवडे म्हणाले. संमेलनामध्ये प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे, सावरकरांच्या जीवनावर आधारित चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावणारे मधुसूदन ताम्हाणे आदी  उपस्थित राहणार आहेत. थायलंडमधील आर्य समाज, हिंदू सभा आणि महाराष्ट्र मंडळ यांचे संमेलनाच्या आयोजनामध्ये सहकार्य असल्याचे दीपक दळवी यांनी सांगितले. महाराष्ट्रातून सुमारे २०० सावरकरप्रेमी १ जुलै रोजी या संमेलनास थायलंडला रवाना होणार आहेत.