डॉ. कुमुद कानिटकर यांनी लिहिलेल्या ‘अंबरनाथ शिवालय-ए मोनोग्राफ ऑन द टेंपल अ‍ॅट अंबरनाथ’ या इंग्रजी संशोधनात्मक ग्रंथाला पॅरिस येथील फ्रेंच अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘इन्स्टिटय़ूट द फ्रान्स’ ची घटक संस्था असलेल्या ‘अ‍ॅकॅडमी ऑफ इनस्क्रिप्शन अ‍ॅण्ड बेल लेटर्स’ यांच्यातर्फे या वर्षीचा ‘हिरायामा’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार २,५०० युरो (सुमारे २ लाख रुपये) इतका आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन ९ मार्च २०१३ रोजी मुंबईत ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. देवागंना देसाई यांच्या हस्ते झाले होते. २१६ पृष्ठांच्या या पुस्तकात ३३० छायाचित्रे आहेत. मंदिरातील शिल्पे आणि शैव सिद्धांतातील संकल्पना यांची सांगड घालणाऱ्या या ग्रंथाच्या निर्मितीसाठी डॉ. कानिटकर यांनी बारा वर्षे संशोधन आणि अभ्यास केला. फ्रेंच इन्स्टिटय़ूट ऑफ पॉन्डेचरी या संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून शैव सिद्धांतावर आधारित अनेक पोथ्यांचे जतन केले आहे. भूर्जपत्रावर लिहिलेल्या आठ हजाराहून अधिक पोथ्या संस्थेकडे आहेत. जगातील शैव सिद्धांतावर आधारित हा सर्वात मोठा संग्रह असल्याची नोंद ‘युनेस्को’कडूनही घेण्यात आली आहे.
या संदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना डॉ. कानिटकर म्हणाल्या की, या देवळाची बांधणी हेमाडपंथी असल्याचे सांगितले जात असले तरी त्यात तथ्य नाही. कारण हे मंदिर अकराव्या शतकात बांधले गेले असून हेमाडपंतांचा काळ तेराव्या शतकातील आहे. या पुस्तकात मंदिराचे संशोधन आणि अभ्यासाकरिता ‘तालमान’ पद्धतीचा वापर केला. मंदिरावरील शिलालेख, मंदिरावर आणि मंदिराच्या आत कोरलेल्या मूर्ती/शिल्पे यांचा अभ्यास करून हे मंदिर शैव सिद्धांत संकल्पनेवर आधारित असल्याचे संशोधन या पुस्तकात मांडले आहे. पुस्तकाचा मराठी अनुवाद लवकरच करण्याचा विचार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा